राजमाता जिजाऊंच्या संस्कारातूनच दोन महान छत्रपती घडले – प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील

0
18


कोतोली प्रतिनिधी – पांडुरंग फिरींगे

राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्य जननी व किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या दोन महान छत्रपतींना घडविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. वीर कन्या, वीर पत्नी व वीर माता म्हणून जिजाऊंचे कार्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे, असे प्रतिपादन श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोलीचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील होते. यावेळी लेफ्टनंट डॉ. मनीषा सावंत व प्रा. टी. एस. कवठेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षदा तानाजी लव्हटे यांनी स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. “उठा, जागे व्हा, संघर्ष करा, यश मिळेपर्यंत थांबू नका” हा स्वामी विवेकानंदांचा संदेश आजच्या युवकांसाठी दीपस्तंभ असून आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभागप्रमुख डॉ. उमा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. यु. एन. लाड यांनी मानले.
यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रो. डॉ. बी. एन. रावण, सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व सामाजिक जाणीव निर्माण झाली.
फोटो ओळ :
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करताना लेफ्टनंट डॉ. मनीषा सावंत व प्रा. टी. एस. कवठेकर; समवेत संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here