
फोटो ओळ: विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे आयोजित राष्ट्रीय
चर्चासत्रामध्ये मुख्य वक्ता म्हणून बोलताना प्रा. डॉ. साताप्पा चव्हाण.
कोल्हापूर | प्रतिनिधी
पांडुरंग फिरींगे.
भारतीय धार्मिक विश्वासाला कट्टरतेच्या चौकटीतून बाहेर काढून मानवी संवेदना, सामाजिक जाणीव आणि विवेकाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हिंदी गीत आणि गझल यांनी केले असून, यामुळेच भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात निडर, मानवतावादी विचारांची निर्मिती झाली, असे प्रतिपादन सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक व भाषातज्ज्ञ प्रा. डॉ. साताप्पा चव्हाण (अहिल्यानगर) यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील हिंदी विभाग व महाराष्ट्र हिंदी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “हिंदी गीत और ग़ज़ल : धार्मिक एवं सांस्कृतिक परिदृश्य” या विषयावरील परिसंवादात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. हाशमबेग मिर्झा होते, तर प्रा. डॉ. गोविंद बुरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. साताप्पा चव्हाण पुढे म्हणाले की, भारतीय समाजाची आस्था, सांस्कृतिक परंपरा, भावविश्व, संवेदना आणि सामूहिक चेतना समजून घेण्यासाठी हिंदी गीत व गझल यांचा सखोल आणि संशोधनात्मक अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. लोकगीते, संस्कारगीते, ऋतुगीते यांमधून समाजाचे जीवनदर्शन, लोकपरंपरा, धार्मिक आचार आणि सांस्कृतिक मूल्ये पिढ्यान्पिढ्या सुरक्षित राहिली आहेत.
हिंदी गीत आणि गझल यांनी धर्माला मानवतेशी जोडण्याचे, प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण केले असून समाजात विवेकशीलतेचा विचार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सत्रात उपस्थित मान्यवरांचा परिचय व प्रभावी सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मुंज यांनी केले, तर कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. अनिल मकर यांनी आभार प्रदर्शन केले.

