मकर संक्रांती निमित्त स्थलांतरित ऊस तोड कामगारांना पोषक भोजन वाटप

0
16


कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरंगे
मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण असून, नकारात्मकतेवर मात करून सकारात्मक विचार आत्मसात करण्याचा संदेश या सणातून दिला जातो. संक्रांतीच्या काळात वातावरणात गारवा असल्याने मानवी पचनशक्ती कमी होते. त्यामुळे पचनास हलके, उष्णतादायी व पोषक अन्न सेवन करणे आवश्यक असते. मात्र समाजातील सर्व घटकांना असे पोषक अन्न सहज उपलब्ध होत नाही. ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन श्रीपतराव चौगुले आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली यांच्या वतीने स्थलांतरित ऊसतोड कामगारांना पोषक भोजनाचे वाटप करण्यात आले, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित पोषक भोजन वाटप कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, भोगीची भाजी ही हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या विविध पालेभाज्या, कंदमुळे व रानभाज्या एकत्र करून तयार केली जाते. या भाजीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स व फायबर असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते व पचनक्रिया सुधारते. बाजरीच्या भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, जे मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त आहे. तसेच तीळ व लोणी शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. म्हणूनच असे पोषक अन्न कामगारांना वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. रावण, सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर तसेच पत्रकार विक्रम पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. आर. पी. नाळे यांनी केले, तर आभार प्रा. टी. एस. कवठेकर यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी स्वतः पोषक भोजन आणून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ :
श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त स्थलांतरित ऊसतोड कामगारांना पोषक भोजन वाटप करताना शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, पत्रकार विक्रम पाटील, प्रा. डॉ. बी. एन. रावण, डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. आर. पी. नाळे, प्रा. टी. एस. कवठेकर व मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here