
कोतोली | प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
केंद्रशाळा कोलोली येथे विद्यार्थिनींच्या आरोग्य, सुरक्षितता व सन्मानाला प्राधान्य देणारा एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय एस. कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून किशोरवयीन मुलींसाठी शाळेमध्येच आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘पिंक रूम’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याअंतर्गत केंद्रशाळा कोलोलीत सुसज्ज पिंक रूम साकारण्यात आली आहे.
किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या काळात शारीरिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. या काळात त्यांना सुरक्षित, स्वच्छ व गोपनीयतेची भावना देणारी स्वतंत्र जागा उपलब्ध असावी, ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या सर्व शाळांमध्ये पिंक रूम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रशाळा कोलोली येथे हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणारी कु. श्रद्धा शशिकांत शेटे हिच्या पालकांनी शालेय पिंक रूमसाठी आवश्यक साहित्य भेट देऊन मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या उपक्रमशील सहकार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम खांडेकर यांच्यासह श्री. संतोष जायभाय, श्री. अजय दाभोळकर, सौ. गीतांजली पाटील, श्री. सुभाष गायकवाड, सौ. अमृता चौगुले, श्री. अजय पाटील आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. सखाराम अंगठेकर यांनी उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार मानले.
विद्यार्थिनींच्या आरोग्य जाणीवेबरोबरच त्यांचा आत्मसन्मान जपणारा हा ‘पिंक रूम’ उपक्रम इतर शाळांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे

