
प्रतिनिधी : जानवी घोगळे
सांगली जिल्ह्यातील जय महाराष्ट्र असंघटित कामगार युनियनच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सविता कुंभार या गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्यरत आहेत. असंघटित कामगार, महिला, विधवा, गरजू व वंचित घटक यांना न्याय मिळावा, शासनाच्या योजना त्यांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेस अर्पण केले आहे.
असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध सेवा, सुविधा व कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कार्य सौ. कुंभार करीत आहेत. अनेक वेळा कागदपत्रांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया, पाठपुरावा अशी किचकट कामे स्वतः पुढाकार घेऊन करून कामगारांना हक्काचा लाभ मिळवून देतात.
महिलांचे आर्थिक स्वावलंबन हेच खरे सक्षमीकरण आहे, या ठाम भूमिकेतून सौ. सविता कुंभार महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून अनेक महिलांच्या हाताला काम मिळाले असून, अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटलेला आहे. विशेषतः विधवा महिलांसाठी पेन्शन योजना राबवण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत त्या नियमितपणे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करतात. ग्रामीण व दुर्लक्षित भागातील महिलांना आरोग्य तपासणी, उपचार व मार्गदर्शन मिळावे, हा त्यामागचा उद्देश आहे. महिलांसाठी असलेल्या विविध मोफत शासकीय योजना, आरोग्य सुविधा व कल्याणकारी उपक्रम यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्या अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहेत.
त्यांच्या अथक परिश्रमांची दखल घेत राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला असून, पुणे येथे दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या समाजकार्याची मिळालेली पोचपावतीच आहे.
भविष्यातही सौ. सविता कुंभार यांचा संकल्प अधिक व्यापक आहे. महिला सबलीकरणावर अधिक प्रभावीपणे काम करणे, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांपर्यंत खास शासकीय योजना पोहोचवणे, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, हेच त्यांचे ध्येय आहे.
निस्वार्थ सेवा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि समाजाविषयीची तळमळ यांच्या जोरावर सौ. सविता कुंभार यांनी समाजामध्ये एक आदर्श समाजसेविकेची प्रतिमा निर्माण केली असून, त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

