
कोल्हापूर | प्रतिनिधी : जानवी घोगळे
देशाच्या सुरक्षेसाठी तब्बल ४५ वर्षे भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सेवा बजावलेल्या माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या इंडियन एअर फोर्स माजी सैनिक संघ, दिघी – पुणे यांच्या वतीने एसपी नाईन मराठी माध्यम समूह, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान माजी सैनिकांनी चॅनलचे स्टुडिओ, कार्यालय तसेच कार्यपद्धती पाहून समाधान व्यक्त करत भरभरून कौतुक केले.
पुणे येथून आलेल्या या माजी सैनिकांनी देशरक्षणासाठी केलेल्या योगदानाबरोबरच समाजासाठीही सकारात्मक विचार जपत माध्यम क्षेत्रात सुरू असलेल्या प्रामाणिक कार्याबद्दल एसपी नाईन मराठी माध्यम समूहाचे विशेष अभिनंदन केले. कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, समाजातील प्रश्नांना वाचा फोडणे आणि बातम्यांचे निष्पक्ष व प्रामाणिक सादरीकरण या बाबी विशेष उल्लेखनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक सागर पाटील यांच्याशी संवाद साधताना माजी सैनिकांनी,“आपण अतिशय उत्तम काम करत आहात. समाजातील चौथा स्तंभ म्हणून माध्यमांची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहात. कलाकार, सामान्य नागरिक आणि सामाजिक प्रश्न यांना न्याय देणारे व्यासपीठ उभे करत आहात, हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला,” अशा शब्दांत कौतुक केले.
तसेच एका शेतकऱ्याचा मुलगा माध्यम समूहाचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून समाजासाठी काम करत आहे, हे ऐकून व पाहून आमचे मन प्रसन्न झाले, अशा प्रतिक्रिया यावेळी माजी सैनिकांनी दिल्या.
या भेटीदरम्यान इंडियन एअर फोर्स माजी सैनिक संघाच्या वतीने कोल्हापूर येथे लवकरच सर्व कुटुंबियांसह ‘गेट-टुगेदर’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण सागर पाटील यांना देण्यात आले.

या सदिच्छा भेटीवेळी रामचंद्र जाधव, पोपट खेडकर, प्रवीण गलांडे, आप्पा जाधव, अशोक शिंदे हे इंडियन एअर फोर्सचे माजी सैनिक उपस्थित होते.
एकंदरीत देशसेवेत आयुष्य अर्पण केलेल्या माजी सैनिकांचा हा स्नेहभाव, आणि समाजहितासाठी कार्यरत असलेल्या माध्यम समूहाला मिळालेली ही सदिच्छा भेट, एसपी नाईन मराठी माध्यम समूहासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.


