
प्रतिनिधी : जानवी घोगळे
राजकीय पक्षांच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन
कोल्हापूर, दि.२० : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांततापूर्ण व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात आला असून, उमेदवारांसाठी सुलभ परवाने उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना लागू करण्यात आली आहे.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील याची खात्री घेण्यासाठी सर्व पावले उचलली जातील. इच्छुक उमेदवारांसाठी आवश्यक परवाने मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व १२ ठिकाणी एक खिडकी योजना अंमलात आणली जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी वेळेत पूर्ण करणे, स्ट्राँग रूम उघडणे व बंद करणे तसेच त्यांची वाहतूक यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडली जाईल. कुठेही मतदान प्रक्रिया खंडित न होण्यासाठी मॉक पोल व आवश्यक तपासण्या मार्गदर्शक सूचनांनुसार केल्या जातील.
मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दोन टप्प्यात घेतले जाणार असून, पहिले प्रशिक्षण २३ व २४ जानेवारी रोजी तर दुसरे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी होईल, असेही त्यांनी नमूद केले. यामुळे निवडणूक यंत्रणेची तयारी चांगली राहील आणि मतदारांना सुलभ मतदानाचा अनुभव मिळेल.

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवडणूक निरीक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा श्रीमती याशनी नागराजन (भा.प्र.से.), उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी यांच्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी डॉ. खिलारी यांनी सादरीकरणातून आचारसंहितेचे तपशीलवार पालन, विविध परवान्यांच्या प्रक्रिया, प्रचार कालावधी, पारदर्शक निवडणुकीत राजकीय पक्षांचे योगदान याबाबत माहिती दिली. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा विश्वास व्यक्त केला. जिल्हा निवडणूक यंत्रणेने तयारी पूर्ण केली असून, सर्व पातळ्यांवर समन्वय साधून ही निवडणूक आदर्श पद्धतीने पार पाडली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


