
प्रतिनिधी : जानवी घोगळे
राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य
25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत 25 जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे. तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. 2026 हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे 16 वे वर्ष आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य ‘माझा भारत माझे मत ‘ हे ठेवले आहे.

भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. येथे कोट्यावधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात. भारतीय लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक, संशोधक आणि लोकशाहीप्रेमी भारतात येतात. यामागे भारतीय लोकशाहीची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार, एक व्यक्ती–एक मत–एक मूल्य ही संकल्पना, धर्म, जात, लिंग, भाषा, आर्थिक स्थिती यांपलीकडे जाऊन दिलेला समान मतदानाचा हक्क, या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात अनुच्छेद 326 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा समान अधिकार बहाल करण्यात आला आहे. हा अधिकार केवळ मतदानापुरता मर्यादित नसून, तो देशाच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संविधानाची अंमलबजावणी होते, कायदे बनतात, धोरणे ठरतात आणि देशाची दिशा निश्चित होते. त्यामुळे मतदानाचा हक्क म्हणजे सामान्य नागरिकांच्या हातात दिलेले अत्यंत प्रभावी लोकशाही अस्त्र आहे. आपले एक-एक मत ग्रामपंचायतीपासून तर संसदेच्या माध्यमातून देश घडविण्यात महत्वपूर्ण ठरते. या देशासाठी काय करायचे तर सर्वप्रथम जागरुक मतदार बनायचे व मतदानाचा हक्क प्रत्येक निवडणुकीत गाजवायचा हे प्रथम कर्तव्य संविधानाला अपेक्षित आहे. 18 वर्षावरील प्रत्येक सुजाण नागरिकाला हा हक्क संविधानाने दिला आहे.

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याची सुरुवात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात झाली. यामागील मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून जागरूक करणे, मतदानाचे महत्त्व समजावून सांगणे आणि विशेषतः नवमतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे. “माझे एका मताने काही फरक पडत नाही” ही भावना लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. प्रत्यक्षात प्रत्येक मत महत्त्वाचे असते आणि अनेक वेळा एका मतानेही निकाल बदलू शकतो.
मतदानातून बहुसंख्य नागरिकांचा विचार प्रतिबिंबित होतो. देश कसा असावा, कायदे कसे असावेत, परस्पर सौहार्द, एकमेकांचा संस्कृतीचा आदर, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक विविधतेचा आदर कसा राखला जावा यासोबतच मूलभूत सुविधा, विकास, पायाभूत सुविधा, नागरी सुविधा हे सर्व काही निवडणुकांमधून ठरते. म्हणूनच मतदान म्हणजे केवळ अधिकार नाही, तर ते एक देश घडविणारे मूलभूत कर्तव्य आहे.
काही वेळा मतदान अनिवार्य का नसावे, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र जिथे सक्ती असते, तिथे लोकशाहीचा आत्मा कमी होतो. भारतात मतदान ऐच्छिक ठेवून नागरिकांच्या विवेकावर आणि कर्तव्यभावनेवर विश्वास ठेवण्यात आला आहे. म्हणूनच निवडणूक आयोग विविध जनजागृती मोहिमा, मतदार नोंदणी अभियान, स्विप (SVEEP) जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी प्रवृत्त करतो. यामागे माझा देश कसा असावा, ही स्वयंप्रेरणा प्रत्येक मतदाराला असावी अशी लोकशाहीमध्ये अपेक्षा आहे.
त्यामुळे येत्या 25 जानेवारीला मतदार दिन साजरा करताना राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने स्वतःकडे आणि आपल्या कुटुंबाकडे बघण्याची गरज आहे. आपण मतदार आहोत का, आपले नाव मतदार यादीत आहे का, आपले मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती वेळेत घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा, आधीच तयारी करून मतदानाला सर्वोच्च प्राधान्य देणे हे जागरूक मतदाराचे लक्षण आहे. मतदानाच्या दिवशी गोंधळ का उडतो याचे आत्मपरिक्षण करणे, हे देखील मतदारांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपले मतदान निश्चित करुन घेण्यासाठी स्वत:ही धडपड करणे आवश्यक असल्याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करणे, हे आजच्या दिवशीचे महत्व आहे. हा एक दिवस स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, संविधान दिवस इतकाच महत्वाचा आहे. आत्मपरीक्षणाचा आहे.

आजच्या काळात मतदार याद्यांमधील नावांचा गैरवापर, बोगस मतदान यांसारख्या अफवांविषयीही नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपले मत अमूल्य आहे. आपल्या नावाने कोणीही गैरवापर करू नये, यासाठी जागरूक राहणे हे देखील मतदाराचे कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने मतदार दिन साजरा करणे म्हणजे केवळ कार्यक्रमात सहभागी होणे नव्हे, तर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सजग राहणे होय. हा देश प्रत्येकाच्या मतांमधून घडतो. लोकशाही मतदारातून उभी राहते. लोकशाहीला धर्म, पंथ, जात, भाषा, समुदाय, लिंग भेद मान्य नाही. मतदान यंत्रलाही हा भेद समजत नाही. आणि कोणताही मतदार दुय्यम नाही, हे समजून घेण्याचा दिवस म्हणजे भारतीय मतदार दिन.
केंद्र व राज्य शासनाने तसेच भारत निवडणूक आयोगाने मतदार दिन साजरा करण्यासंदर्भात विविध अधिकृत अध्यादेश, मार्गदर्शक सूचना आणि परिपत्रके जारी केली आहेत. या शासकीय दस्तावेजांचा केंद्रबिंदू एकच आहे-जबाबदार, सुजाण आणि सक्रिय मतदार घडवणे.
देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, अखंडता आणि एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मतदार दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मतांच्या संख्येवरुन देश घडतो. ही संस्था संविधानाच्या रक्षणाची, अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित करते. कारण लोकशाही ही केवळ शासनाची व्यवस्था नाही, तर ती नागरिकांच्या सहभागातून जिवंत राहणारी जीवनपद्धती आहे. म्हणूनच, २५ जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयाने आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणून साजरा करावा—आपण आपल्या मताधिकाराचा योग्य वापर करतो का, आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आपले कर्तव्य बजावतो का, याचा विचार करण्याचा दिवस.
निवडणूक आयोगाने मतदार होणे ही प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे. या संदर्भात अनेक ॲप्स उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने देखील नोंद करता येते. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा निवडणूक कार्यालय बाराही महिने कार्यरत असते. या ठिकाणी तत्परतेने मतदार होण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे मतदार होणे ही फार कठीण प्रक्रिया नाही. यावर्षी देखील राष्ट्रीय मतदार दिन अतिशय उत्साहात देशभरात साजरा होत आहे.
शेवटी, हा देश आपला आहे आणि तो आपल्या मतातून घडतो. ही भावना मनात ठेवून, प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे हाच राष्ट्रीय मतदार दिनाचा खरा अर्थ आहे.
प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
9702858777

