कोल्हापूर प्रतिनिधी: प्रियांका शिर्के पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता दोन्ही गटाकडून पक्षबांधणी, पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत असून, शरद पवार गटातील नेते विविध भागांना भेटी देत आहेत.
यातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना, हे शिवधनुष्य ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उचलले पाहिजे, असे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गेल्या २५ ते ३० वर्षांत जळगाव जिल्ह्यातील लोकसभेचे दोन्ही खासदार भाजपचे निवडून दिले आहेत. त्यामुळे आता हे कार्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून उचलले पाहिजे.
शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ खडसे काम करीत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत लढण्याचे शिवधनुष्य तुम्ही उचलले पाहिजे.
आगामी विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. यात तुम्हाला निश्चित यश येईल, असा मला विश्वास आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलावे
लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसे यांनी उचलावे. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दोन्ही जागा निवडून दिल्या, त्याप्रमाणे ‘राष्ट्रवादी’लाही लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे जिल्ह्यातून रावेर लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सन १९८५ मध्ये या जिल्ह्याने तब्बल सात आमदार निवडून देऊन १०० टक्के निकाल दिला होता, ही या जिल्ह्याची परंपरा आहे, अशी आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.
दरम्यान, जालना येथील लाठीहल्ला प्रकरणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर टीका केली. लाठीहल्ल्याचे आदेश आम्ही दिलेले नाहीत, असे ते म्हणत आहेत.
या मंत्र्यांना न विचारताच जर लाठीहल्ला होत असेल, तर सरकारमध्ये काय करता, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.