वडगाव येथील पोलीस पाटील अमीर हजारी यांच्या मुदतवाढीचा प्रश्न रखडला; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

0
11

प्रतिनिधी : रोहित डवरी

वडगाव (ता. हातकलंगले, जि. कोल्हापूर) — मौजे वडगाव येथील पोलीस पाटील अमीर दगडू हजारी यांनी ऑगस्ट २०१० ते ऑगस्ट २०२५ असा सलग पंधरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांच्या कार्यकाळात महसूल व पोलीस प्रशासनाकडून कामकाजाबाबत सकारात्मक अहवाल देण्यात आला असून, जुलै २०२५ मध्ये माननीय तहसीलदार हातकलंगले यांच्या शिफारशीसह मुदतवाढीचा प्रस्ताव प्रांत कार्यालय, इचलकरंजी येथे दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गावातील काही व्यक्तींनी अमीर हजारी हे अल्पसंख्यांक समाजातील असल्याच्या कारणावरून जातीय द्वेषातून खोटी तक्रार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या तक्रारीनंतर प्रांत कार्यालय, इचलकरंजी येथे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान सुमारे १००० नागरिकांनी लेखी निवेदने, प्रतिज्ञापत्रे सादर करून तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून अमीर हजारी यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले आणि तेच पुढेही पोलीस पाटील राहावेत, अशी मागणी केली.

नागरिकांच्या या भूमिकेनंतरही सदर प्रकरणावर अंतिम निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही ग्रामस्थांनी राजकीय दबाव आणि जातीय पूर्वग्रहामुळे निर्णय प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामुळे अमीर हजारी यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना गावकऱ्यांत व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले असून, लवकरात लवकर न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सकारात्मक प्रशासकीय अहवाल, नागरिकांचा पाठिंबा आणि चौकशीत आरोप खोटे ठरूनही निर्णय लांबणीवर टाकणे हे अन्यायकारक आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पंधरा वर्षांच्या सेवेत अमीर हजारी यांनी गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने काम केले असून, सर्व समाजघटकांशी समन्वय राखला आहे. त्यामुळे मुदतवाढीबाबत तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी होत आहे.

प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसून, पुढील निर्णयाकडे वडगावकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here