
प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
अन्यथा ‘गड स्वच्छता मोहीम’ – हिंदूत्ववादी संघटनांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
२७ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापुरात धडक निवेदन
कोल्हापूर (प्रतिनिधी):
ऐतिहासिक वारसा असलेल्या पन्हाळा गडावरील पाराशर तीर्थ (सादोबा तलाव) परिसरात उभारण्यात आलेले तीन मजली अनधिकृत बांधकाम व अन्य धार्मिक अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करावीत, अशी ठाम मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध हिंदूत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने येत्या दोन दिवसांत ठोस कारवाई न केल्यास समस्त शिवभक्त व गडकोटप्रेमी स्वतः ‘गड स्वच्छता मोहीम’ राबवून ही अतिक्रमणे हटवतील, असा आक्रमक इशाराही यावेळी देण्यात आला.
ऐतिहासिक वारशाचे विद्रुपीकरण
निवेदनात नमूद केल्यानुसार, पन्हाळा किल्ला हा केंद्र व राज्य सरकारद्वारे संरक्षित स्मारक असून तो युनेस्कोच्या Maratha Military Landscapes of India या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. अशा अत्यंत संवेदनशील व ऐतिहासिक स्थळावर पुरातत्त्व विभागाचे नियम धाब्यावर बसवून पक्के सिमेंट-काँक्रीटचे तीन मजली बांधकाम उभारण्यात आले आहे. यामुळे केवळ ऐतिहासिक वारशाचे विद्रुपीकरण होत नसून, जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन होण्याचा धोका असून भविष्यात मिळणारा आंतरराष्ट्रीय निधीही धोक्यात येऊ शकतो, अशी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे
विश्व हिंदू परिषद व हिंदू एकता आंदोलन गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याबाबत ९ जुलै २०२४ रोजीही निवेदन देण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीत सदर जागा शासकीय असल्याचे व बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही वर्षभर कोणतीही ठोस कारवाई न होणे ही गंभीर बाब असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनासह कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या
पाराशर तीर्थ परिसरातील तीन मजली अनधिकृत बांधकाम त्वरित पाडावे.
या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
येत्या दोन दिवसांत प्रशासन व शिवप्रेमी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी.
कार्यकर्त्यांचा संताप
“गडकोट ही आमची श्रद्धास्थाने आहेत, केवळ पर्यटन स्थळे नाहीत. त्यांच्या पावित्र्याशी खेळ करणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही कदापि खपवून घेणार नाही,” असा ठाम इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील, विलास मोहिते, आशिष लोखंडे, गजानन तोडकर, संदीप सासने, हिंदुराव शेळके, प्रतीक डिग्गे, निलेश शिंदे, श्रीकांत कदम, सचिन भोसले, प्रदीप मोहिते, नागेश हुगार, बाबू साखळकर, अंजली जाधव, पूजा शिंदे, जयवंत खतकर, कैलास दीक्षित यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

