बसला दगड मारणाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास; प्रवरा नदीच्या पुलावर घडली होती घटना

0
66

कोल्हापूर प्रतिनिधी: प्रियांका शिर्के पाटील

संगमनेर : पुलावर रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीच्या जवळून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस गेल्याचा राग आल्याने त्या व्यक्तीने बसला दगड मारला होता. तसेच बस चालकाच्या कॅबिनमध्ये चढून चालकाला लाथाबुक्यांनी मारहाण केली होती.

ही घटना २ सप्टेंबर २०१५ ला संगमनेरातील प्रवरा नदीच्या पुलावर घडली होती. यातील आरोपी अफजल अन्सार पठाण (रा. नाईकवाडपूरा, संगमनेर) याला तीन महिने सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.

येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी हा बुधवारी (दि. ०६) हा निकाल दिला.

२ सप्टेंबर २०१५ ला रात्री ९.१५ च्या सुमारास नाशिक-पलूस (सांगली) ही बस (एम. एच. १४, बी.एन. ४२३९) घेऊन चालक धनाजी बळवंत भालेकर हे पलूसकडे जात असताना संगमनेर शहरातील प्रवरा नदीच्या पुलावर एक जण डावीकडून उजवीकडे रस्ता ओलांडत होता.

बस जवळून गेल्याचा राग आल्याने त्याने बसला दगड फेकून मारला होता. चालक भालेकर यांनी बस थांबविल्यानंतर दगड फेकून मारणारा बसचे चालक कॅबिनमध्ये चढला, त्याने भालेकर यांना मारहाण केली, त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला.

मारहाण करणाऱ्याचे नाव अफजल अन्सार पठाण असे असून तो संगमनेर शहरातील नाईकवाडपूरा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली होती.

याप्रकरणी भालेकर यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. पोलिस हेड कॉस्टेबल इस्माईल शेख यांनी अधिक तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. संजय वाकचौरे यांनी चार साक्षीदार तपासले. या खटल्याचा निकाल न्यायाधीश मनाठकर यांनी देत आरोपी पठाण याला तीन महिने सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये द्रव्य दंडाची तसेच दंड न भरल्यास एक महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉस्टेबल प्रवीण डावरे यांनी काम पाहिले.

त्यांना पोलिस कॉस्टेबल दीपाली दवंगे, नयना पंडित, स्वाती नाईकवाडी, प्रतिभा थोरात यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here