
पन्हाळा : संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ. संजीव जैन व उपस्थित मान्यवर.
पन्हाळा : प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
मराठी भाषेचे वैभव, समृद्ध परंपरा आणि साहित्यिक वारसा जपण्याच्या उद्देशाने सोमवार पेठ, पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, मुंबई यांच्या परिपत्रकानुसार दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वी. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. हे पूजन संस्थेचे प्राचार्य डॉ. संजीव जैन यांच्या शुभहस्ते पार पडले. मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
या निमित्ताने संस्थेच्या ग्रंथालय विभागात मराठी साहित्याचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्रे, वैचारिक साहित्य यांसह विविध विषयांवरील मराठी ग्रंथ मांडण्यात आले होते. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमास शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे, विभागप्रमुख डॉ. विनायक देवकर, प्रा. सरदार देशमुख, प्रा. अरविंद भंडारी, प्रा. जब्बार मेवेकरी, प्रा. राहुल नेजकर, क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत इंगवले, रजिस्ट्रार दीपक पाटील, सहाय्यक ग्रंथपाल संग्राम पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे चेअरमन पी. आर. भोसले आणि सहसचिव एन. आर. भोसले यांचे या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन लाभले. मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक वापर दैनंदिन जीवनात व्हावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीप्रती आपुलकी निर्माण करणारा हा उपक्रम संजीवनमध्ये अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

