
कोतोली | प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि दलित चळवळीचा वैचारिक वारसा जपणाऱ्या दीनबंधू दिनकरराव यादव यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा सखोल आलेख मांडणाऱ्या ‘माजी आमदार दलितमित्र दीनबंधू दिनकरराव यादव’ या ग्रंथाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात पार पडले.
शिरोळ येथे दीनबंधू भाई दिनकरराव यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ११व्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या कवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते हा ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या वेळी साहित्य, समाजकारण व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष वैचारिक उंची देणारी ठरली.
या ग्रंथाचे लेखक कोतोली येथील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. उदयकुमार लाड असून, त्यांनी दीनबंधू दिनकरराव यादव यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरचे अध्यक्ष तसेच विधानसभेचे आमदार म्हणून बजावलेल्या भूमिकेचा अभ्यासपूर्ण व वस्तुनिष्ठ आढावा या ग्रंथातून मांडला आहे.
साहित्य, समाज आणि इतिहासाचा संगम
ग्रंथ प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ कवयित्री नीलम मानगावे, लेखक डॉ. अनिल मडके, उध्दानपंडित गणपतराव (दादा) पाटील, नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, सुनील इनामदार, डॉ. दगडू माने, अर्थतज्ज्ञ प्राचार्य डॉ. जे. के. पवार, शंतनू यादव, अनिलकुमार यादव, संभाजीराव यादव, सचिन इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक संस्थेची प्रेरणा, संशोधनात्मक मांडणी
या ग्रंथनिर्मितीसाठी डॉ. लाड यांना संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले (आण्णा), सचिव शिवाजीराव पाटील, संचालक डॉ. अजय चौगुले, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. तसेच माजी प्राचार्य डॉ. जे. के. पवार व माजी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे डॉ. लाड यांनी सांगितले.
दीनबंधू दिनकरराव यादव यांचे सामाजिक, राजकीय व मानवी मूल्यांवर आधारित कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या ग्रंथातून साध्य झाले असून, हा ग्रंथ सामाजिक इतिहासाचा मौल्यवान दस्तऐवज ठरणार आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
‘दीनबंधू दिनकरराव यादव’ ग्रंथाचे प्रकाशन करताना कवी विठ्ठल वाघ. सोबत (डावीकडून) नीलम मानगावे, नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, डॉ. जे. के. पवार, गणपतराव पाटील, डॉ. उदयकुमार लाड, डॉ. अनिल मडके आदी.

