
कोल्हापूर | प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
कोल्हापूरच्या कर्तृत्ववान कन्येने जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक उंचावला आहे. विश्वविक्रमवीर भारतविभूषण डॉ. अनुप्रिया गावडे यांना ग्लोबल चाइल्ड प्रॉडिजी अवॉर्ड्स २०२५ तर्फे सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. १५ वर्षांखालील असामान्य व बहुआयामी प्रतिभावान बालकांचा गौरव करणारा हा जगातील पहिलाच आणि सर्वोच्च उपक्रम मानला जातो.इतिहासात प्रथमच ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स येथे झालेल्या या भव्य जागतिक समारंभात जगभरातील १३० हून अधिक देशांमधून निवडलेल्या १०० सर्वोत्तम बालप्रतिभांचा गौरव करण्यात आला. भारत सरकार, सिंगापूरचे राष्ट्रपती, ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रहमान, नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी, किरण बेदी यांसारख्या जागतिक मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
शिक्षण, संविधान आणि समाजभान यांचा संगम – अनुप्रिया गावडे
अनुप्रिया गावडे हिने अल्पवयातच संविधान जनजागृती या विषयावर अनेक प्रभावी उपक्रम राबवले असून ती अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रात भाषण, निबंध, सादरीकरण व बौद्धिक स्पर्धांमधून तिने आजपर्यंत १०० हून अधिक पदके पटकावली आहेत.
क्रीडा, NCC आणि समाजसेवा – सर्वच आघाड्यांवर चमक
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच अनुप्रिया महाराष्ट्र बटालियन ५ NCC ची कॅडेट असून क्रीडाक्षेत्रातही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांमधील तिचा सक्रिय सहभाग तिच्यातील प्रगल्भ सामाजिक भान अधोरेखित करतो.
६० पेक्षा अधिक पुरस्कारांची मानकरी
आजपर्यंत ६० हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झालेली अनुप्रिया सध्या शांतिनिकेतन स्कूल मध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. तिला शाळेच्या संचालिका सौ. राजश्री काकडे, प्राचार्या सौ. जयश्री जाधव तसेच सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
संस्कारांची शिदोरी, कर्तृत्वाची भरारी
अनुप्रिया ही नाइट कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. अक्षता गावडे व चार्टर्ड अकाउंटंट अमितकुमार गावडे यांची कन्या असून, घरातील शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण तिच्या यशामागील प्रेरणास्थान ठरत आहे.
कोल्हापूरच्या लेकीने लंडनच्या संसदेत भारताचे प्रतिनिधित्व करत नव्या पिढीपुढे आदर्श उभा केला आहे. अनुप्रिया गावडे ही केवळ एक विद्यार्थीनी नसून, ती उद्याच्या भारताची दिशा दाखवणारी तेजस्वी आशा आहे.


