
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सशी संबंधित PACE हायड्रेशन ब्रँड भारतीय बाजारात येणार
- आरसीपीएलच्या आरोग्य-केंद्रित पेय पोर्टफोलिओमध्ये महत्त्वपूर्ण विस्तार
- पुढील पाच वर्षांत 50 पाश्चात्य बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याची तयारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची एफएमसीजी शाखा रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय ‘बेटर-फॉर-यू’ बेवरेज कंपनी गुडनेस ग्रुप ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड (GGG) मध्ये मोठी हिस्सेदारी विकत घेतली आहे. या करारामुळे ऑस्ट्रेलियन ग्राहक बाजारात प्रवेश करत आरसीपीएलने आपल्या जागतिक विस्ताराच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत, आरसीपीएल गुडनेस ग्रुपचे प्रमुख ब्रँड नेक्सबा तसेच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कर्णधार पॅट कमिन्स यांच्या सह-निर्मितीतून विकसित झालेला PACE हायड्रेशन ड्रिंक भारतासह अनेक नव्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमामुळे आरसीपीएलच्या आरोग्याधारित पेय पोर्टफोलिओला अधिक बळ मिळेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
आरसीपीएलचे संचालक टी. कृष्णकुमार यांनी सांगितले, “भारतामधून एक जागतिक एफएमसीजी कंपनी म्हणून आरसीपीएलला स्थापित करण्याच्या दिशेने ही भागीदारी एक महत्त्वाचे पाऊल आहे. नेक्सबा आणि PACEसारखे हेल्थ-फोकस्ड ब्रँड आमचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत करतील. आमच्या सक्षम पुरवठा साखळी आणि वितरण क्षमतेच्या माध्यमातून हे ब्रँड भारतासह अन्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. जागतिक दर्जाची उत्पादने परवडणाऱ्या किमतीत प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

आरसीपीएल सध्या यूएई, कतार, ओमान, बहरीन, नेपाळ आणि श्रीलंका या बाजारपेठांमध्ये आधीच कार्यरत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये रसकिक आणि सन क्रश ज्यूस, झिरो-शुगर कार्बोनेटेड पेये तसेच ‘शून्य’ हा हर्बल-नॅचरल ब्रँड यांचा समावेश आहे.
गुडनेस ग्रुपचे संस्थापक ट्रॉय डग्लस यांनी सांगितले, “आमच्या ब्रँड्सना आणि नवकल्पनांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही उत्साहित आहोत. आरसीपीएल ही वेगाने वाढणारी आघाडीची एफएमसीजी कंपनी असून, आमच्या जागतिक विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी आम्हाला एक भक्कम भागीदार मिळाला आहे. पुढील पाच वर्षांत 50 पाश्चात्य बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट असून, ही भागीदारी ‘बेहतर-आरोग्य’ श्रेणीत जागतिक नेतृत्व मिळवण्यासाठी मदत करेल.”
सिडनीस्थित गुडनेस ग्रुप ग्लोबल ऑस्ट्रेलियासह 21 पेक्षा अधिक देशांमध्ये आरोग्य-केंद्रित पेय पर्याय उपलब्ध करून देत आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये नेक्सबा गट-हेल्थ ड्रिंक, BISON प्रोटीन पेय, GOOD BREKKIE लिक्विड ब्रेकफास्ट तसेच PACE हायड्रेशन ड्रिंक यांचा समावेश आहे.

