
प्रतिनिधी : जानवी घोगळे
आजरा तालुक्यातील डोंगरवाडी या दुर्गम आणि जंगल परिसरातील गावात राहणाऱ्या ९७ वर्षीय गुंडू शेळे या वृद्ध आजोबांच्या आयुष्यात NSUI च्या कार्यकर्त्यांनी प्रकाशाची नवी किरणे आणली आहेत. वीज सुविधा नसलेल्या त्यांच्या घरात सोलर पॅनल व चार बल्बची व्यवस्था करून देत NSUI ने सामाजिक बांधिलकी जपली.
गुंडू शेळे हे वयोमानामुळे कमकुवत झाले असून त्यांची दृष्टीही कमी झाली आहे. जंगल परिसरातील एकाकी घर, सोबत चार जनावरे आणि तेलाच्या छोट्याशा दिव्यावर चालणारा प्रपंच – अशी त्यांची जीवनस्थिती होती. अंधारामुळे त्यांना दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

NSUI चे मित्र सागर मांडवकर व बाळकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी आजोबांची भेट NSUI टीमशी झाली होती. त्यावेळी त्यांच्या घरात वीज नसल्याची व अंधारामुळे होणाऱ्या समस्यांची माहिती समोर आली. त्यानंतर NSUI च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत छोट्या स्वरूपातील सोलर पॅनल बसवून चार बल्बची व्यवस्था करून देण्याचा निर्णय घेतला.
आज NSUI च्या सर्व टीमने डोंगरवाडी येथे जाऊन गुंडू शेळे यांच्या घरी सोलर पॅनल व लाईट बसवून दिली. अनेक वर्षांनंतर आपल्या घरात लागलेले उजळ बल्ब पाहून आजोबांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. “आता अंधारात राहावे लागणार नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमावेळी NSUI चे अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले, निपुन चौगुले, प्रणव पाटील, गौरव कांबळे, सागर मांडवकर, समर्थ जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमासाठी मा. सतेज पाटील साहेब, मा. ऋतुराज पाटील दादा व मा. जयंत आसगांवकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
दुर्गम भागातील गरजू नागरिकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा NSUI चा संकल्प असून, समाजातील वंचित घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी संघटना पुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.


