
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर : शहरातील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी आनंदाची पर्वणी ठरलेले मातोश्री इंग्लिश स्कूल तसेच आयडियल तायक्वांदो व सी.के. झुंबा योगा अकॅडमी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व प्रात्यक्षिक सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमांना कोल्हापूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. श्री. विजयसिंह (रिंकू) देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरणे, तायक्वांदोची प्रभावी प्रात्यक्षिके, तसेच झुंबा योगाचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. रंगतदार कार्यक्रमामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बोलताना रिंकू देसाई साहेबांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे आणि कौशल्याचे कौतुक केले. “शिक्षणासोबत क्रीडा आणि संस्कार यांचा समतोल साधणारी ही पिढी कोल्हापूरचा अभिमान आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पालकांशी संवाद साधत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असेही नमूद केले.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि अकॅडमीचे प्रशिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त दाद दिली.
शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे सोहळे कोल्हापूरच्या तरुण पिढीच्या प्रगतीचे प्रतीक ठरले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

