
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील बी.ए. भाग तीनच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने मौजे दिगवडे येथे लिंगभेद आणि मानसिक आरोग्य या महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर व्यापक मानसशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील सामाजिक रचना, स्त्री-पुरुषांमधील भेदभावाची मानसिक परिणामकारकता आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण माहिती संकलित केली.या सर्वेक्षणामध्ये बी.ए. भाग तीनच्या विद्यार्थ्यांनी घरभेटी देत नागरिकांशी संवाद साधला. प्रश्नावलीच्या माध्यमातून विविध वयोगटांतील ग्रामस्थांची मते जाणून घेतली. ग्रामीण समाजजीवनातील बदलते प्रवाह, स्त्री-पुरुष समानतेची जाणीव आणि मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता यावर विद्यार्थ्यांनी निरीक्षणे नोंदविली.या उपक्रमास दिगवडे गावातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. पोलीस अधिकारी सरदार पाटील, सरपंच मारुती पाटील, ग्रामसेविका सुरेखा जांभीलकर, पोलीस पाटील नंदकुमार पाटील, दीपक पवार तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत सहकार्याची भूमिका दर्शविली.कार्यक्रमाचे संयोजन मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जे. ए. सरदेसाई व डॉ. एन. डी. मांगोरे यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे संशोधन पद्धतीची ओळख करून देत सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण समाजरचनेचा जवळून अभ्यास करता आला असून सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील दृष्टिकोन विकसित करण्यास मदत झाली आहे. शिक्षणासोबत समाजप्रबोधनाची जोड देणारा हा उपक्रम दिगवडे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
फोटो ओळ : मौजे दिगवडे येथे आयोजित मानसशास्त्रीय सर्वेक्षणावेळी श्रीपतराव चौगुले कॉलेजचे विद्यार्थी, पोलीस अधिकारी सरदार पाटील, सरपंच मारुती पाटील, ग्रामसेविका सुरेखा जांभीलकर, पोलीस पाटील नंदकुमार पाटील, दीपक पवार, प्रा. जे. ए. सरदेसाई, डॉ. एन. डी. मांगोरे व इतर मान्यवर उपस्थित.

