सौरऊर्जा जोडणी रखडल्याने शेतकऱ्यांची अडचण; राज्याध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांची तातडीची मागणी

0
20

कोल्हापूर / प्रतिनिधी :
सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत असतानाच प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सौरऊर्जा जोडणीसाठी प्रचंड प्रतीक्षा करावी लागत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. शिवाजीराव परुळेकर (राज्याध्यक्ष, किसान संघटन व राज्य महासचिव, समाजवादी पार्टी महाराष्ट्र) यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

परुळेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी सौरऊर्जा योजनेसाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला होता. त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर आवश्यक ती रक्कमही भरली; मात्र पैसे भरूनही सौरऊर्जेची प्रत्यक्ष जोडणी अद्याप मिळालेली नाही. प्रशासनाकडून वारंवार “पुढील महिन्यात जोडणी मिळेल” असे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सध्या शेतीला पाण्याची अत्यंत गरज असताना, बोरिंगमधून पाणी उपलब्ध असूनही वीजजोडणी नसल्यामुळे शेतकरी पिके घेऊ शकत नाहीत. परिणामी उत्पादन घटत असून कर्जफेड करणेही कठीण होत आहे. “राज्यस्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असताना मला हा अनुभव आला, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय असेल याची कल्पनाच करवत नाही,” असे परुळेकर यांनी नमूद केले.

महाराष्ट्राची सौरऊर्जेबाबत जागतिक पातळीवर नोंद होत असताना तळागाळातील शेतकऱ्यांना वेळेवर जोडणी न मिळणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तातडीने आवश्यक साहित्य पाठवून सौरऊर्जेची जोडणी देण्यात यावी, अशी त्यांनी संबंधित विभागाकडे आग्रहाची विनंती केली आहे.

शेतकऱ्यांना वेळेत सौरऊर्जा उपलब्ध झाली तर उत्पादन वाढीस चालना मिळेल, कर्जबाजारीपण कमी होईल आणि शासनाच्या योजनांचा खरा लाभ तळागाळापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here