
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करताना डॉ. जे. के. पवार समवेत शिवाजीराव पाटील, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. उषा पवार, प्रा. पी. डी. माने, डॉ. संपदा पिसे, सुरेश पाटील व मान्यवर.
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
“जगात अनेक राजे झाले; पण त्यांनी प्रजेवर राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मात्र माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. स्त्रियांना सन्मानाने, निर्भयपणे जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले. म्हणूनच त्यांच्या कार्याची जयंती चारशे वर्षांनंतरही अभिमानाने साजरी केली जाते,” असे प्रेरणादायी प्रतिपादन कोल्हापूर येथील शाहू अध्यासनाचे संस्थापक-अध्यक्ष व अर्थायनकार डॉ. जे. के. पवार यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयंती कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. जे. के. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. वातावरणात देशभक्तीपर घोषणा घुमत होत्या.
“शिवराय फक्त राजे नव्हते; ते युगपुरुष होते” – डॉ. विजयकुमार पाटील
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ते देवदूतच होते. राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांतून स्वराज्याची संकल्पना रुजली. त्यांनी घेतलेली स्वराज्याची शपथ पूर्ण करून दाखवली. ते पराक्रमी योद्धेच नव्हे, तर दूरदृष्टीचे आणि लोकाभिमुख प्रशासक होते. शिवराय जन्मले नसते तर हे राज्य निर्माण झाले नसते.”
यावेळी शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रभावी चित्रफीत दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांनी ती उत्स्फूर्तपणे पाहत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कोतोली ते शेलारवाडी ‘मेगा पदयात्रा’; युवाशक्तीचा जयघोष
जयंतीनिमित्त कोतोली ते शेलारवाडी मार्गावर भव्य ‘मेगा पदयात्रा युवा मोहीम’ काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमवला. समाजातील स्त्री-सन्मान, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत युवक-युवतींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास संस्था सचिव शिवाजीराव पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. रावण, सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार, श्रीपतराव चौगुले विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संपदा पिसे, आय.टी.आय. प्राचार्य सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. पी. डी. माने यांनी केले. आभार डॉ. यू. एन. लाड यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डी. एच. नाईक यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

