प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा गुळाच्या चवीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या गुळाचा हंगाम सुरू झाला आहे.
प्रत्येक वर्षी ऑक्टोबरच्या सुरूवातीला सुरूवातीला सुरू होणारे गुऱ्हाळे सध्या महिनाभर आदिच सुरू झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक करवीर, कागल, पन्हाळा या तालुक्यात गुऱ्हाळ घरे आहेत. दरम्यान कागल आणि करवीर तालुक्यातील जवळपास २५ ते ३० गुन्हाळाचे धुराडे पेटले आहे.
कोल्हापूर जिल्हा उत्पन्न बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसाला ३० किलोच्या गुळाच्या रव्याची आवक ७ हजारांच्या आसपास आहे. तर कमी वजनाच्या रव्यांची आवक २५ ते ३० हजारांवर आहे.
सध्या आवक थोडी कमी असल्याने दोन दिवसातून एकदा सौदा होत आहे. तर ५० हजारांपेक्षा जास्त गूळ रव्यांची आवक सुरू झाल्यानंतर नियमित सौदा काढण्याचे बाजार समितीकडून माहिती मिळाली.
दरम्यान कोल्हापूरसोबत कर्नाटकातही गुऱ्हाळ घरे लवकर सुरू होतात. परंतु यंदा पाऊस कमी असल्याने विजापूर, गुलबर्गा, चिक्कोडी या भागांत ऑगस्ट महिन्यापासून गुऱ्हाळे सुरू केली आहेत.
तर कोल्हापूर जिल्ह्यातही तीच परिस्थिती असल्याने लवकर गुन्हाळे सुरू झाली आहेत.गतवर्षी जिल्ह्यात १२५ गुऱ्हाळे सुरू झाली होती; तर २१ लाख ४० हजार गूळ रव्यांची आवक झाली होती.
यावर्षी हंगाम लवकर सुरू होत आहे. सध्या तरी ४० गुन्हाळे सुरू आहेत. शीतगृहातील गुळाची विक्री झाली आहे. त्यामुळे बाजारात गुळास चांगली मागणी आहे. यामुळे दर ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपये क्विंटल असा दर सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अडसाली ऊस घेऊन गुन्हाळे सुरू केली आहेत.
सध्या कर्नाटकातून दोन- तीन ट्रक गूळ आवक होत आहे. कर्नाटकाच्या गुळास ३६०० ते ३८०० रुपये दर मिळत आहे. सध्या कर्नाटकातूनही चांगल्या दर्जाचा गूळ उपलब्ध केला जात असल्याने त्या गुळासही चांगला दर मिळत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
किरकोळ बाजारात साखरेपाठोपाठ गूळही महागला आहे. ५५ रुपयांवरून आता ६० रुपये किलो म्हणजेच किलोमागे पाच रुपयांची दरवाढ झाली आहे. आता गणेशोत्सवात आणखी दोन ते तीन रुपयांनी गूळ महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑगस्टमध्ये मुंबई ‘एपीएमसी’त गूळ ४१ ते ४७ रुपये किलो होता. आज ४६ तो ५१ रुपये झाला आहे. कराड, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांतून गुळाची आवक मुंबई ‘एपीएमसी’त होते. सध्या उत्पादन कमी असून, दिवाळीनंतर नवीन उत्पादन बाजारात येईल.