कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर – बहुजन समाजाच्या विकासाला सत्तेची जोड हवी म्हणून आम्ही सत्तेसोबत गेल्याचे यशवंतराव चव्हाण यांनी १९८१ ला सांगितले होते. तोच विचार करून आम्ही आता भाजपसोबत सत्तेत गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री येथे झालेल्या सभेत सांगितले.
आमच्यावर लोकांची कामे करण्याचा दबाव होता. अन्य कोणत्याही दबावाला बळी पडणारे आम्ही नाही. कारण आम्हीही मराठ्यांची औलाद आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. फुले-शाहू-आंबेडकर यांची पुरोगामी विचारधारा घेऊनच पुढील राजकारण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
येथील तपोवन मैदानावर ही सभा झाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या सभेचे आयोजन केले. सभेला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, आमदार मकरंद पाटील, रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.