कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : घरफोड्या, दुचाकी चो-या आणि मोबाइल चोरीच्या घटना वाढत असतानाच भुरट्या चो-यांमुळेही नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतातील विद्युत पंप, केबल, जनावरे, बांधकामाचे साहित्य यासह हाताला लागेल ती वस्तू पळवण्याचे प्रकार वाढले आहेत.
त्यामुळे भुरट्या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
किणी (ता. चंदगड) येथे मारुती सटुप्पा मनवाडकर (वय ६२) यांच्या घराच्या खाप-या काढून चोरट्यांनी एक भरलेला गॅस सिलिंडर, एक रिकामा गॅस सिलिंडर, तांब्याच्या दोन कळशा, हंडा, दोन टेबल फॅन आणि खाद्य तेलाचा १५ किलोचा डबा असा दहा हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत त्यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
जांभूळवाडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री सरस्वती विद्यालयातील दोन स्मार्ट टीव्ही, एक लॅपटॉप आणि शालेय पोषण आहारातील ५० किलो तांदळाचे पोते असा ३४ हजार २५० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी पळवले. हा प्रकार सोमवारी (दि. ११) सकाळी निदर्शनास आला. याबाबत बाळासाहेब मुरारी वालीकर (वय ४९, रा. भडगाव रोड, गडहिंग्लज) यांनी नेसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
इचलकरंजी येथील हत्ती चौकात असलेल्या गोडाऊनमधून चोरट्यांनी ३२ हजार रुपयांच्या डेकोरेशनच्या वायरी, केबल आणि अन्य साहित्य लंपास केले. शनिवारी (९) हा प्रकार लक्षात आला. याबाबत आकाश राजू हावळ (वय २६, रा. हत्ती चौक, इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
ग्रामीण भागात शेळ्या, बोकड यासह विद्युत पंप, लोखंडी साहित्य चोरीचे प्रकार सुरूच आहेत. शहरातून रोज किमान दोन ते तीन दुचाकींची चोरी होते. बाजारपेठा, भाजी मंडई, बस स्थानकातून महिलांचे दागिने लंपास केले जातात. यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.