गांजाचे ग्रहण सुटेना!, कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये गांजा, मोबाइल टाकण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

0
91

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर– कळंबा कारागृहातील कैद्यांसाठी गांजा आणि मोबाइलचे दोन बॉक्स भिंतीवरून आत फेकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गस्तीवरील पोलिसांनी अटक केली. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारासही ताब्यात घेतले.

किशोर मारुती चौगले (वय २२) आणि मास उर्फ करण शामराव साळुंखे (वय २५, दोघे रा. नवशा मारुती मंदिर, राजारामपुरी, कोल्हापूर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

गांजा आणि मोबाइलचे बॉक्स कारागृहात टाकण्यासाठी देणारा फिरोज (पूर्ण नाव उपलब्ध नाही) याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवारी (दि. १२) पहाटे सव्वादोनच्या सुमारास घडली.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल प्रकाश आनंदराव पाटील हे सहकारी कॉन्स्टेबलसोबत गस्त घालताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील भिंतीजवळ एक तरुण संशयित हालचाली करताना दिसला. 

त्याला ताब्यात घेऊन चौकशी करताना आणखी दोघे जवळच्या झुडपात लपल्याचे दिसले. तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे दोन बॉक्स मिळाले.

त्यात फिरोज नावाच्या तरुणाच्या सांगण्यावरून कारागृहातील कैदी किरण सावंत आणि ऋषिकेश चौगले उर्फ गेंड्या यांच्यासाठी गांजा आणि मोबाइलचे बॉक्स फेकत होतो, अशी कबुली अटकेतील दोघांनी दिली.

अटकेतील दोघे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. गांजा आणि मोबाइलचे बॉक्स देणाऱ्या फिरोजचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

झडतीत काय मिळाले..?

तीन लहान मोबाइल, दोन ॲन्ड्रॉईड मोबाइल, दोन राऊटर, चार्जिंग केबल, डेटा केबल, ६५ ग्रॅम गांजा आणि एक दुचाकी असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

फिरोजच्या मित्रांसाठी पुरवठा

पसार असलेला संशयित फिरोज हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला आहे. कारागृहातील दोन मित्रांना गांजा आणि मोबाइल पुरवण्यासाठी त्याने सराईत गुन्हेगारांची मदत घेतली, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले.

यामुळे कारागृहातील कैद्यांचे बाहेरच्या गुन्हेगारांशी असलेले संबंध आणि कारागृहात अवैधपणे होणारा वस्तूंचा पुरवठा समोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here