कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
भांडुपमध्ये नोकरीसाठी जन्मदात्या आईने चार दिवसांच्या चिमुकलीला रस्त्यावर सोडल्याचा घटनेने अनेकांना सुन्न केले. पोलिसांमुळे ती तुटलेली नाळ पुन्हा जुळविण्यास पोलिसांना यश आले.
मात्र, आजही अनेकजण वेगवेगळ्या कारणांतून बाळांना कोण रस्त्याच्या कडेला, तर कोण कचराकुंडीत फेकून देत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
मूळची दार्जिलिंगची रहिवासी असलेली २२ वर्षीय तरुणी भांडुप परिसरात राहते. २०२१ मध्ये तिचे सिक्कीममधील तरुणासोबत लग्न जुळले. त्यात गर्भवती राहिली. सुरुवातीला दोघांनाही बाळ नको होते. तिने मुंबई गाठली. त्यात नुकतीच एका हॉटेलमध्ये नोकरी लागली.
बाळामुळे नोकरी करण्यास अडचण होत होती. त्यात, जवळही कोणी नसल्याने तिने बाळालाच सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे. नजर चुकवून बाळाला रस्त्याकडेला सोडल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वी हाजीअली दर्गा येथे एका दाम्पत्याने बाळाला एका भिक्षेकरी महिलेकडे सोडून दिले होते.
दुधासाठी पैसे दिले नाही म्हणून…
२०२१ : कोरोनामुळे आधीच उपासमारीची वेळ ओढावली असतानाच प्रियकरानेही मुलाच्या दुधासाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईने भुकेने व्याकूळ झालेल्या चार ते पाच महिन्यांच्या बाळाला चिंधी बाजारातील फुटपाथजवळ सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मात्र, सुदैवाने हे बाळ एका मातेला सापडले. तिने या मुलाला दूध पाजून पोलिसांच्या हवाली केले. पुढे जे.जे. मार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आईचा शोध घेत तिला बेलापूरमधून अटक केली.
गरजू मातांना पैशांचे आमिष
झोपडपट्टी परिसरातील गरीब महिलांना हेरून त्यांना पैशांचे आमिष दाखवून अनेकदा टोळीतील म्होरके आई-वडिलांकडूनही बाळ खरेदी करून पुढे विक्री करीत असल्याचेही पोलिसांच्या करवाईतून समोर आले आहे.
बाळाची खरेदी अथवा अपहरण करीत त्यांची मुंबईबाहेर बेकायदा विक्री केल्याचेही यापूर्वीच्या करवाईतून उघड झाले आहे.
अनैतिक संबंध
अनेक प्रकरणांत अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला रस्त्यावर सोडून दिल्याचेही समोर आले आहे.