राजेखान जमादारच संजय मंडलिकांना अडचणीत आणतायत का? मुश्रीफ गटाची विचारणा

0
70

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : शिवसेना- शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, मंडलिक गटाचे प्रमुख नेते, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना ऐन खासदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत आणत आहेत की काय?

असे प्रत्युत्तर गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी दिले.

हणबरवाडी पूल-रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही ठेकेदाराची वर्क ऑर्डर का अडवून ठेवली आहे, ठेकेदाराला मुश्रीफ साहेबांना भेटायला का सांगत आहात, अशी प्रश्नांची सरबत्ती करत राजेखान जमादार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच जोरदार वाद घातला होता.

यावर प्रत्युत्तर देताना युवराज पाटील व भैया माने म्हणाले, एका रस्त्याच्या कामाचा मुद्दा काढून त्यांनी जे नाट्य केले.

ते करण्याची गरजच नव्हती. कारण; हे काम मंडलिक यांच्या पत्रावरून आहे की मुश्रीफ यांच्या पत्रावरून यामुळे हे काम अनेक दिवस थांबलेले. दरम्यान; कडगाव – बेकनाळ- बाळेघोल रस्त्यावरील पुलाचे काम नामदार हसन मुश्रीफ यांच्या मागणीनुसारच मंजूर झाले आहे.

जमादार यांनी मंत्री मुश्रीफ यांना जरी विचारले असते किंवा आमच्याशी चर्चा केली असती तरी ही कृत्य त्यांना टाळता आले असते.

पत्रकात पुढे म्हटले आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास खाते होते, त्यावेळी खासदारांना निधी देण्याचे कोणतेही धोरण ठरलेले नव्हते.

तरीसुद्धा मुश्रीफांनी मोठ्या मनाने खासदार मंडलिक यांना विकासकामांसाठी कोट्यावधीचा स्वतःचा निधी दिला. याबद्दल खासदार मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांचे जाहीर कार्यक्रमातून आभारही मानले आहे.

एवढा निधी दिलेला असतानाही अवघ्या दीड कोटीच्या रस्त्याच्या कामासाठी राजेखान जमादार एवढे अकांडतांडव आणि आक्रस्ताळेपणा कशासाठी करीत आहेत? असा प्रश्नही केला.

मंडलिक यांच्यावरती दबाव

जमादार हे मुरगुड नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना त्यांच्याच गटातील नगरसेवकांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन रस्त्याच्या कंत्राटावरून फ्रीस्टाइल केलेली अनेक उदाहरणे आणि वर्तमानपत्रांमधून वाचलेली आहेत.

तसेच; स्वतःचा गट निर्माण करून सातत्याने खासदार संजय मंडलिक यांच्यावरती दबाव वाढवत आहेत. याचे पडसादही भविष्यात दिसतीलच.

खासदार मंडलिकांनी समज देण्याची गरज

आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही वेळ सामंजस्याने वागण्याची आहे. एवढ्याशा साध्या गोष्टीसाठी त्यांनी केलेल्या आकांडतांडव आणि आक्रस्ताळेपणाबद्दल खासदार मंडलिक यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे.

मुश्रीफ यांनी हजारो कोटींचा निधी दिलेला आहे. त्यामुळे कंत्राटदारांबद्दलची त्यांची भूमिका सर्वांनाच माहीतही आहे. एखादे काम का प्रलंबित आहे, याची माहिती मुश्रीफ किंवा आम्हाला जरी त्यांनी सांगितले असते, तरीही हा प्रश्न निकालात निघाला असता.

बजेट बुकचाच पुरावा

मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये कडगांव- बेकनाळ- बाळेघोल या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५४ वर हणबरवाडी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम हे काम नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मागणीनुसार मंजूर आहे. त्याचा हा घ्या बजेट बुकचाच पुरावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here