कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : चीन येथे २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारतीय रग्बी संघ सहभागी होत आहे. त्यात कोल्हापूरच्या वैष्णवी पाटील व कल्याणी पाटील या दोघींची भारतीय संघात निवड जाहीर झाली.
या निवडीची घोषणा बुधवारी रात्री बोरनिओ (मलेशिया) येथे झालेल्या सराव शिबीरादरम्यान करण्यात आली.
रग्बी इंडिया तर्फे ३० जुलै ते २० सप्टेंबर या कालावधीत पश्चिम बंगाल येथे भारतीय रग्बी संघाचे सराव शिबीर आयोजित केले होते. यात विविध राज्यातील ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
त्यातून गेल्या दहा दिवसांपासून बोरनिओ (मलेशिया) येथे निवड १७ खेळाडूंचे सराव शिबीर दक्षिण आफ्रीकेचे लुद्रीक यांच्या उपस्थितीत विशेष शिबीर आयोजित केले होते. त्यातून मंगळवारी १२ जणांचा भारतीय रग्बी संघ निवडण्यात आला.
त्यात कोल्हापूरच्या वैष्णवी पाटील व कल्याणी पाटील या दोघींची या संघात वर्णी लागली. वैष्णवीने यापुर्वी उझबेकिस्तान, जकार्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या संघात प्रतिनिधीत्व केले होते.
तर कल्याणीने बोर्निओ (मलेशिया) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दमदार कामगिरी केली होती.
यासह राज्य, राष्ट्रीय स्पर्धेतही केलेल्या कामगिरीची दखल घेवून या दोघींची भारतीय संघात सरावासाठी प्रथम निवड करण्यात आली होती. त्यातील उल्लेखनिय कामगिरी आणि परदेशातील सराव शिबीरातील कामगिरीची दखल घेवून अंतिम संघात निवड करण्यात आली.
या दोघींना रग्बी इंडियाचे अध्यक्ष राहूल बोस, महाराष्ट्र रग्बीचे नासिर हुसेन, संदीप मोसमकर, प्रशिक्षक सुरजित घोष, सुरभी दाते, असोसिएशनचे पेट्रन चिफ मालोजीराजे, मधुरिमाराजे, अध्यक्ष प्रा. अमर सासने, प्रशिक्षक दीपक पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.