कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर अखेर १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतलं.
त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संदीपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांचीदेखील उपस्थिती होती. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
आता, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी ५ अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही राजेंची उपस्थिती आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह काही मंत्री हजर असताना त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
त्यानंतर, भाषण करताना मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांच्या कामाचं कौतुक केलं. “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही” असं म्हटलं आहे.
तसेच मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं. आपली भूमिका मी अगदी स्पष्टपणे मांडली आहे, उपोषण सोडलं त्याबद्दल आभारी आहे असंही शिंदेंनी सांगितलं. आता, देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन समाधान व्यक्त केलं आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठीची पुढील दिशाही सांगितली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे.
मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही. मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या.
आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण, तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल, असेही फडणवीस यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
१० दिवस वाढवून घ्या, पण टीकणारे आरक्षण द्या
मुख्यमंत्री शिंदे धाडसी निर्णय घेणारे आहेत. ते आपल्याला न्याय देतील हा आपल्याला विश्वास आहे. मराठा समाजाला विश्वासात घेवून मी त्यांना वेळ दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही.
त्यांनाही मागे हटू देणार नाही. साहेब, समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस वाढवून घ्या. पण आम्हाला कायम टिकारे आरक्षण द्या. जीव गेला तरी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही.
मी भारावून गेलो नाही महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो. टिकणारे आरक्षण द्या.