उज्वला लाड :- आंबा
दिनांक 13 सप्टेंबर रोजी विद्या मंदिर तळवडे येथे पारंपारिक पाककृती दिन व आजी आजोबा दिन असा संयुक्त उपक्रम अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. सध्याचे युग हे अतिशय धावपळीचे व इन्स्टंट फास्ट चे युग आहे.
सध्याच्या काळात सर्वच गोष्टींबरोबरच आपला आहार सुद्धा फास्ट फूडचे स्वरूप घेत आहे, सध्या शहरांबरोबर खेडोपाड्यात सुद्धा फास्ट फूड जंक फूड चे स्टॉल बघायला मिळतात , अशा पदार्थांमध्ये चवीसाठी घातक पदार्थ मिक्स केले जातात , व याचे पोषणमूल्य कमी असते , या पार्श्वभूमीवर आपापल्या स्थानिक भागात पिकत असलेल्या, व उपलब्ध असलेल्या पिक व धान्यांपासून बनवलेले पारंपारिक पदार्थ हेच पोषणासाठी सुरक्षित व महत्त्वाचे ठरत आहेत.
म्हणून पारंपरिक पद्धतीने बनवलेले वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांच्या माता ने शाळेत आणावेत व त्याचा एक दिन साजरा करावा अशी संकल्पना सौ. भारती पाटील मॅडम व सौ.वैष्णवी रेडीज मॅडम यांच्या प्रयत्नातून राबविण्यात आली.
अंगणवाडी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या मुलांच्या माता पालकांनी या मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वजणींनी आवडीने पारंपारिक व वेगवेगळे पदार्थ बनवून शाळेत घेऊन आल्या. यामध्ये रानभाज्या नाचणीचे पदार्थ तांदळाचे पदार्थ,असे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ पाहायला मिळालेत, आणि आपली ग्रामीण खाद्य संस्कृती किती विविधतेने नटलेली आहे याची प्रचिती आली. सध्या आहारात कमी प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ या मेळाव्यात पाहायला मिळाले. यामुळे ग्रामीण खाद्य संस्कृती जतन होण्यास व त्याची ओळख होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
या सर्व पदार्थांची प्रस्तावना झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अशा उपक्रमांद्वारे वेगवेगळ्या पदार्थांची पाककृती जाणून घेण्यास महिलांना मदत झाली. त्यासोबतच शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. सध्याच्या मर्यादित व विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबांचे महत्त्व व संस्कार पुढच्या पिढीला मिळावेत यासाठी आजी आजोबांचे महत्त्व सांगणारा हा शासनाचा उपक्रम राबवण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी शाळेत हजेरी लावली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आजी आजोबांचे औक्षण व स्वागत केले अशाप्रकारे नेटके संयोजन सौ. भारती पाटील मॅडम यांनी केले. त्यानंतर विद्यार्थी व माता पालक यांची संयुक्त सहल मानोली डॅम येथे नेण्यात आली, तेथे या लहानग्या मुलांनी व पालकांनी धरणाच्या बॅक वॉटर च्या प्रवाहात मनमुराद भिजण्याचा आनंद लुटला.
अशाप्रकारे ग्रामीण संस्कृतीला संजीवनी देणारा हा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.