
प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर हॅलो प्रभात:
कोल्हापुर छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून दररोज सुटणारी कोयना एक्सप्रेस ही हजारो नोकरदार व सर्वसामान्य प्रवाशांसाठी जीवनदायिनी ठरलेली गाडी. पूर्वी ही गाडी सकाळी ८.१० वा. सुटत असल्याने कोल्हापूर–सांगली–मिरज–ओगलेवाडी येथे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचणे शक्य होत होते. मात्र, नुकतीच सुरू झालेल्या कोल्हापूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य देत कोयना एक्सप्रेसची वेळ बदलून ८.२५ वा. करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा ताण, त्रास व नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.
वंदे भारत गाडी सकाळी ८.१५ वा. सुटते आणि दुपारी १.१५ वा. पुण्यात पोहोचते. या वेळेमुळे या गाडीने प्रवास करणारे प्रवासी मोजकेच असूनही, रिकाम्या डब्यांनी धावणाऱ्या वंदे भारतला प्राधान्य देण्यासाठी कोयना एक्सप्रेसची वेळ बदलण्यात आल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.
दरम्यान, कोयना एक्सप्रेसची वेळ पूर्ववत ८.१० वा. करण्यात यावी, यासाठी प्रवाशांनी संबंधित विभागाला वारंवार लेखी निवेदने दिली आहेत. परंतु प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
या वेळ बदलामुळे रोज नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी कोल्हापूर–सांगली मार्गावर प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली असून वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहचणे अवघड झाले आहे. पर्यायी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक व मानसिक तणावही वाढला आहे.
कोट
“कोयना एक्सप्रेसची जुन्या वेळेनुसार ८.१० वा. त्वरित सुटण्याची व्यवस्था करावी. वंदे भारतला प्राधान्य देताना रोजंदारीवर जगणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न दुर्लक्षित करू नये.”
तानाजी पाटील प्रवासी
प्रवाशांची नाराजी शिगेला पोहोचली असून संबंधित प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी आता जोर धरत आहे.

