
कोल्हापूर, प्रतिनिधी — जानवी घोगळे
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कोल्हापूर जिल्हा केवळ ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशासाठीच नव्हे, तर निसर्गसौंदर्यासाठीही ओळखला जातो. या निसर्गाशी माणसाचे नाते अधिक दृढ करण्याचे आणि साहसप्रिय समाज घडवण्याचे कार्य मागील १४ वर्षांपासून कोल्हापूर हायकर्स या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. एका लहान गटाने सुरू केलेला हा प्रवास आज हजारो निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि साहसी युवकांचे मोठे कुटुंब बनला आहे.
१४ वर्षांपूर्वी काही मोजके सह्याद्रीप्रेमी एकत्र आले आणि गड-किल्ल्यांचे जतन, पर्वतारोहण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला. त्यातूनच कोल्हापूर हायकर्स या संस्थेचा जन्म झाला. सुरुवातीला केवळ ट्रेकिंगपुरता मर्यादित असलेला हा उपक्रम आज पर्यावरण रक्षण, समाजभान, सांस्कृतिक जपणूक आणि युवक सशक्तीकरण करणारी व्यापक चळवळ बनली आहे.
गेल्या १४ वर्षांत कोल्हापूर हायकर्सने सह्याद्रीतील अनेक दुर्गम गड-किल्ल्यांवर यशस्वी मोहिमा राबवल्या आहेत. पन्हाळा, विशाळगड, प्रचंडगड, रांगणा, भुदरगड, सिंहगड, तोरणा यांसारख्या ऐतिहासिक स्थळांवर केवळ ट्रेकिंग न करता, त्या ठिकाणचा इतिहास आणि वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. यासोबतच किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमा, प्लास्टिकमुक्त अभियान आणि वृक्षारोपण उपक्रमांतून पर्यावरण संरक्षणाचा ठाम संदेश दिला आहे.
विशेष म्हणजे संस्थेच्या सदस्यांनी हिमालयातील उंच शिखरे सर करण्याचा पराक्रमही केला आहे. त्रिशूल, चंद्रशिला, केदारकंठा, हर-की-दून यांसारख्या मोहिमांमुळे कोल्हापूर हायकर्सचा लौकिक केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही वाढला आहे. या मोहिमांमधून अनेक युवकांमध्ये आत्मविश्वास, धैर्य, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे.
संस्थेने केवळ साहसावरच भर न देता शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा, तसेच प्राथमिक गिर्यारोहण अभ्यासक्रम आयोजित केले आहेत. यामुळे युवकांमध्ये नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक बळकट झाली आहे.
कोल्हापूर हायकर्स हे आज केवळ एक ट्रेकिंग ग्रुप न राहता स्थानिक समाजाशी नाते जोडणारे एक प्रभावी व्यासपीठ बनले आहे. गावागावांतून जनजागृती, पर्यावरण रक्षण उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास अशा विविध सामाजिक कार्यांत संस्था सक्रिय सहभाग घेत आहे.
संस्थेचा १४ वा वर्धापन दिन हा केवळ उत्सव नसून, वाटचालीचे आत्मपरीक्षण आणि भविष्यासाठी नव्या संकल्पांचा दिवस आहे. ‘निसर्ग जपा – इतिहास जपा – पुढच्या पिढीसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवा’ हा संदेश घेऊन कोल्हापूर हायकर्सची पुढील वाटचाल अधिक जोमाने सुरू राहणार आहे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या वर्धापन दिनानिमित्त सर्व सदस्य, मार्गदर्शक, स्वयंसेवक आणि निसर्गप्रेमींनी एकत्र येत गेल्या १४ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा केला.
संस्थापक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ‘कोल्हापूर हायकर्स’ कुटुंबाला १४ व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

