
प्रतिनिधी : जानवी घोगळे
- सुलभ लसीकरणासाठी U-WIN डिजिटल प्लेटफॉर्मवर नोंदणीचे आवाहन
कोल्हापूर : जिल्ह्यातील नियमित लसीकरण कार्यक्रम 2025–26 अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. भिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई तसेच विविध विभागातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत 57 टक्के पूर्ण लसीकरण झाले असून, आगामी मार्चपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वर्ष भरा मध्ये गरोदर माता, बालके व विध्यार्थी मिळून एकूण 4 लाख पेक्षा जास्त लाभार्थीना लसीकरणाचा लाभ दिला जातो. या अनुषंगाने आरोग्य विभागाने सुधारित राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक तयार केले असून, सनियंत्रण यंत्रणा अधिक भक्कम करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. जन्म शासकीय किंवा खासगी दवाखान्यात झाला तरी बाळाला जन्मता हेपेटाइटिस बी, झिरो पोलिओ व बीसीजी या तीन महत्वाच्या लसी देण्यासाठी पालकांनी आग्रह धरला पाहिजे. जेणेकरून जन्मा पासून बाळाला गंभीर आजरा पासून सुरक्षितता मिळेल. सर्व शासकीय दवाखान्यात नियमित लसीकरण अंतर्गत सर्व लसी मोफत मिळतात.

या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 13,262 लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लसीकरणात सहभागी न झालेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करावे, तसेच प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचे फायदे सांगावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. गर्भवती महिला व नवजात बालक लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी खबरदारी घेण्यावरही त्यांनी भर दिला. याशिवाय, शालेय स्तरावर 14 वर्षांच्या मुलींना संस्थात्मक लसीकरणाऐवजी शाळेतच लस देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
डिजिटल नोंदणीसाठी ‘U-WIN’ प्लॅटफॉर्मचा वापर वाढवा
गर्भवती महिला आणि बालकांचे लसीकरण सुलभ करण्यासाठी भारत सरकारचा U-WIN हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून गर्भवती महिलांची नोंदणी, जन्मापासून 16 वर्षांपर्यंतच्या मुलांचे 12 प्रतिबंधक आजारांवरील लसीकरणाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग, डिजिटल प्रमाणपत्र आणि एसएमएस अलर्ट मिळतात. यातून देशभरातील कोणत्याही केंद्रावर लसीकरणाची सुविधा मिळते.
U-WIN सिटिज़न अॅप गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून किंवा uwin.mohfw.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून नोंदणी करता येते. मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे ओटीपी व्हेरिफिकेशन करून आवश्यक माहिती भरल्यास नोंदणी पूर्ण होते. गावस्तरवर आशा कार्यकर्त्यांना अॅपचा वापर आणि नोंदणी प्रक्रियेसाठी योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, असा सल्ला बैठकीत देण्यात आला. लसीकरणात सहभागी नागरिकांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. या पोर्टलवर लसीकरण संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच यावरील नोंदणीमुळे शिक्षण,नोकरी निमित्त पेरदेशी जाताना अडचणी निर्माण होणार नाहीत.


