
प्रतिनिधी : जानवी घोगळे
मुंबई 04:- राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पूर्वी त्यांनी केलेल्या अस्थायी सेवेचा ‘सेवाखंड कालावधीत क्षमापित करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्याना मोठा दिलासा मिळाला असून, आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात आज आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात 150 डॉक्टरांना ‘सेवा खंड कालावधी क्षमापित’ केले बाबतच्या पत्राचे वितरण करण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत. उर्वरित पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही पत्र देण्यात येणार असुन, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन समाधान व्यक्त होत आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात 2009 पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. सन 2009 साली या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे. मात्र ‘सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते.
वैद्यकीय अधिकारी यांचे संघटने कडून या बाबत वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते आज पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित केल्याचे पत्र देण्यात आले. या निर्णयामुळे शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असुन त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ मिळतील.
वैद्यकीय सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवाखंड क्षमापित करणे बाबतचा प्रश्न प्रदीर्घ कालावधीनंतर निकालात निघाला आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्थेत निश्चित गुणात्मक वाढ होईल अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.

यावेळी मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, शासकीय आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या पद्धतीने द्यावी. खाजगी रुग्णालयापेक्षा सरकारी रुग्णालयाचा नागरिकांनी पसंती द्यावी. अशा प्रकारची सेवा अपेक्षित आहे. नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन सह विशेष इन्सेक्टिव्ह देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठविला आहे .
शासकीय रुग्णालयांमध्ये चांगली सेवा देता यावी. शस्त्रक्रिया व विशेष उपचारांमध्ये विशेषज्ञांची सेवा मिळावी या दृष्टीने शासकीय रुग्णालयांना देखील इन्सेंटिव्ह फंड देण्याबाबत शासन निर्णय घेतला आहे. यामुळे हा निधी शासकीय रुग्णालयांना वैद्यकीय सेवा व सुविधांसाठी उपलब्ध होईल.

महात्मा फुले जन आरोग्य रोग योजनेतून उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांचे संख्या वाढून 2399 करण्यात आली आहे . मंदिरात जसे देवाचे स्थान असते तसे रुग्णालयात डॉक्टर कडे रुग्ण पाहत असतो त्यामुळे वैद्यकीय सेवेतील व्यक्तींनी समर्पित भावनेने काम करावे, असे आरोग्य मंत्री श्री आबिटकर म्हणाले .
यावेळी आरोग्य भवन मध्ये झालेल्या कार्यकमात मंत्री महोदयांच्या हस्ते सेवा खंड क्षमापित बाबतचे पत्र पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आली. आरोग्य भवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात 150 वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे पत्र वितरित करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



