
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. — जिल्हाधिकारी यांनी अलीकडेच दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना बॉटल व कॅनमधून पेट्रोल–डिझेल विक्री बंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्याचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष मा. उत्तम शिवाजी पोवार यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
सध्या जिल्ह्यात पिक काढणी, ऊसतोडणी तसेच शेती मशागतीची कामे जोमात सुरू आहेत. विहिरीवरील पाणी उपसा, औषध फवारणी यंत्रणा, जनावरांच्या चाऱ्याची कापणी, डिझेल-पेट्रोलवर चालणारी शेती उपकरणे अशा सर्व कामांसाठी शेतकऱ्यांना छोट्या प्रमाणात इंधन आवश्यक असते. ते प्रामुख्याने कॅन किंवा बॉटलमध्ये नेण्याची गरज असते. परंतु बंदी आदेशामुळे इंधन मिळण्यात अडथळे निर्माण झाले असून शेतीच्या कामात अडथळे येत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर पोवार यांनी मा. पालकमंत्री व मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर आदेशाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कॅन/बॉटल मधील इंधनविक्रीवरील बंदी तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच या विषयात तातडीने कार्यवाही करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय तात्काळ दूर करण्याची गरज असल्याचे पोवार यांनी नमूद केले असून, प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी सुर्यकांत देशमुख, रत्नमाला कांबळे,सुखदेव शेटे, प्रशांत माने, प्रदिप सावंत,गोविंद आवळे, अर्जुन साळोखे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

