
प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर, दि. 03 : विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर (आर्ट्स–कॉमर्स विभाग) यांच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत भोगावती सहकारी साखर कारखाना, परिते (ता. करवीर) येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली. साखर निर्मिती प्रक्रिया, सहकारी उद्योग व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार प्रणाली तसेच प्रदूषण नियंत्रण पद्धतींची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. इयत्ता १२ वी कॉमर्स विभागातील एकूण ५१ विद्यार्थ्यांनी या भेटीत सहभाग घेतला.
अभ्यास भेटीदरम्यान कारखाना व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना साखर निर्मितीतील सर्व विभागांची सविस्तर माहिती दिली. ऊस क्रशिंगपासून साखर निर्मितीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे स्पष्टीकरण करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विभागनिहाय कार्यपद्धती, व्यवस्थापकीय पदांची जबाबदारी, आर्थिक लेनदेन व्यवस्था, व्यापार व संपर्क पद्धती यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून नोंदी केल्या.
२ डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन असल्याने या औचित्याला साजेसा उपक्रम म्हणून कारखान्याच्या औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (ETP) विशेष भेट देण्यात आली. सांडपाण्याचे शुद्धीकरण कसे केले जाते, ते पुनर्वापरासाठी योग्य कसे बनवले जाते याची माहिती पर्यावरण शिक्षक श्री. अनिल धस यांनी प्रत्यक्ष दाखवून विद्यार्थ्यांना दिली.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. अभ्यास भेटीसाठी आवश्यक परवानगी व सहकार्य भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. एस. ए. पाटील यांनी दिले. व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. बी. पाटील व अधिक्षक श्री. एन. बी. जाधव यांनीही आवश्यक ते मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात व रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. उपक्रम नियोजन श्री. पी. वाय. राठोड यांनी केले. प्रा. सौ. एस. एन. ढगे, प्रा. सौ. पी. पी. पडेलकर, श्री. ए. आर. धस यांनी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी केला. स्टाफ सेक्रेटरी श्री. बी. एस. कोळी तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
या अभ्यास भेटीमुळे विद्यार्थ्यांना उद्योग व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाची प्रत्यक्ष जाण मिळून त्यांचा शैक्षणिक दृष्टीकोन अधिक व्यापक झाला.

