
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रतिक्षित आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन 2025 ला आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते भव्य सुरुवात झाली. गेली सात वर्षे सातत्याने होत असलेले हे प्रदर्शन आता शेतकऱ्यांसाठी माहिती, तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग आणि कृषी उद्योगाच्या संधींचे महासंगमस्थळ बनले आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान, बदलत्या शेतीपद्धती आणि बाजारपेठांचे स्वरूप—या सर्वांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य दिशादर्शन आवश्यक आहे. सतेज कृषी प्रदर्शन या सर्व गोष्टींचा खरा आरसा आहे. आजची शेती परंपरागत राहिलेली नाही; तंत्रज्ञान, रेन हार्वेस्टिंग, उत्पादन खर्चात बचत, नवीन प्रयोग—हे सर्व इथं शेतकरी एका छताखाली शिकणार आहेत.”
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्यासाठी काहीतरी वेगळे, उपयुक्त घडावे या विचाराने आमदार सतेज पाटील यांनी सात वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात केली. आज या प्रदर्शनामध्ये तब्बल दहा कोटींच्या आसपास उलाढाल होते. हजारो शेतकरी तंत्रज्ञान, साधने, बियाणे, अवजारे आणि उत्पादने खरेदी करून आपल्या शेतीला नवे वळण देतात.”
राधा म्हैसचे आकर्षण — गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक तीन फूटाची ‘राधा’
या वर्षीच्या प्रदर्शनातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सातारा जिल्ह्यातील मलवडी गावातील अनिकेत बोराटे यांची जगप्रसिद्ध तीन फुटांची ‘राधा म्हैस’.
– केवळ दोन फूट आठ इंच उंची,
– ३१४ किलो वजन,
– तेरापेक्षा अधिक प्रदर्शनातील सहभाग,
– आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!
पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 28 ऑक्टोबर 2025 रोजी तिचा विक्रम नोंदवण्यात आला. राहुरी आणि परभणी विद्यापीठांनीही तिच्यावर संशोधन सुरू केले आहे.
प्रदर्शनातील वैशिष्ट्ये — एक संपूर्ण कृषी विश्व एकाच छताखाली
- देश–विदेशातील 250 पेक्षा अधिक नामांकित कृषी कंपन्यांचा सहभाग
- 150 हून अधिक पशुपक्षी दालनं
- बी-बियाणे, खते, यंत्रसामग्री, आधुनिक ड्रोन, ए.आय. शेती तंत्रज्ञान
- तांदूळ महोत्सव – आजरा घनसाळ, इंद्रायणी, रत्नागिरी 24, भोगावती तांदूळ थेट शेतकऱ्यांकडून
- फुलांचे प्रदर्शन व विक्री
- बचत गटांचे मोफत स्टॉल
- लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क
- शेतीत नवीन प्रयोग, स्मार्ट शेती, पाचट व्यवस्थापन, ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक
- तीन दिवस तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे
गोकुळ, चितळे डेअरी, संजय घोडावत ग्रुप, महालक्ष्मी शेती विकास केंद्र यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटन प्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना उपप्रमुख विजय देवणे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, आमदार जयंत आसगावकर, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक विनोद पाटील, सुनील काटकर, धीरज पाटील, कृषी विज्ञान केंद्रचे जयवंत जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे, डॉ. प्रमोद बाबर, नगरसेवक दुर्वासबापू कदम व स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत हे विशेष प्रयत्नशील आहेत.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
शेतीविषयक ताज्या घडामोडी, तंत्रज्ञान, उपकरणे आणि बाजारपेठेची माहिती थेट जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे.
आमदार सतेज पाटील आणि आयोजकांनी सर्व शेतकरी व नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.

