कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
राजापूर (रत्नागिरी) : आपली जमीन आणि घर वाचविण्यासाठी लढणाऱ्या महिलांवर जर राज्य शासन काठ्या चालविणार असेल तर मुख्यमंत्री प्रकल्पासाठी आपलं घर आणि जागा सोडतील का, जर मुख्यमंत्री असं करू शकत नाहीत तर या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तरी आपली जागा का सोडावी, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
सोलगाव, बारसू, गोवळ पंचक्रोशीतील महिलांतर्फे देवाचे-गोठणे केरावळे येथे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी त्यांनी उपस्थित महिलांकडून रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलनाविषयी तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या दमदाटीबाबत माहिती घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांचा प्रकल्पाला विरोध असेल त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नेहमीच जनतेच्या बाजूने राहील, अशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे.
त्यामुळे बारसू, सोलगाव, गोवळ पंचक्रोशीतील स्थानिक भूमिपुत्रांनी उभारलेल्या रिफायनरी प्रकल्प विरोधी लढ्यात शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी राहील.
रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार मिळेल या केवळ शासनाच्या अफवा आहेत. प्रकल्प झाल्यास येथील पर्यावरणाचा ऱ्हास होईलच शिवाय मुंबईप्रमाणे कोकणही परप्रांतीयांच्या हातात जाईल. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प अन्यत्र कोठेही करा पण कोकणात नको. – ऋता सामंत-आव्हाड.
रत्नागिरी जिल्ह्यात बंद पडत चाललेले उद्योग वाचविण्यात येथील पालकमंत्र्यांना रस नाही, मात्र रिफायनरी प्रकल्पासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे, यामागे नेमके गौडबंगाल काय? रिफायनरी ही कोकणाला लागलेली कीड आहे. – ॲड. अश्विनी आगाशे.