कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, शुक्रवारी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे पार पडत आहे. सभेची सुरुवात मोठ्या गोंधळाने सुरु झाली.
सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे होते. गोंधळामुळे सभास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप, प्रत्यारोपांमुळे आजची वार्षिक सभा वादळी होण्याची शक्यता होतीच. तीन वर्षांपूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर विरोधक महाडिक गटाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप करण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने गोकुळचे लेखापरीक्षण करण्यासाठीचा मार्ग मोकळा करून दिला. यासह अन्य मुद्द्यांवरून गोकुळ संचालिका शौमिका महाडिक वारंवार आवाज उठवत आहेत. गोकुळमध्ये गैरकारभार होत असल्याचे आरोपही महाडिक यांनी केले होते.