कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग यांना हौतात्म्य आले. कर्नल मनप्रीत सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मात्र एका प्रसंगाने उपस्थितांचे डोळे अक्षरशः पाणावले. शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांच्या मुलाने लष्करी गणवेश परिधान केला होता आणि आपल्या शहीद पित्याला अखेरचा सॅल्यूट केला. हे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.
कर्नल मनप्रीत सिंग यांचे पार्थिव मुल्लानपूर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या शेकडो स्थानिकांनी श्रद्धांजली वाहिली. शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी, दोन वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. कर्नल मनप्रीत यांच्या मुलाने त्यांना सलामी दिली आणि अखेरचा निरोप दिला.
लष्करी वर्दी घालून लहान मुलाचा शहीद पित्याला सॅल्यूट
कर्नल मनप्रीत सिंग यांच्या मुलाने शहीद पित्याला लष्करी गणवेश परिधान करत शेवटची सलामी दिली. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओत लहान मुलगा शहीद पित्याला सॅलूट करत शेवटची सलामी करताना पाहायला मिळत आहे.
या लहान मुलाच्या शेजारी त्याची लहान बहीणही दिसत आहे. लष्करी वर्दीत लहान मुलाने शहीद पित्याला सॅलूट करताच उपस्थितांना अश्रू अनावर झाले.