अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?”; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल

0
110

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटी

नवी दिल्ली – भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी स्वत:च्याच सरकारला पत्र पाठवलंय. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच त्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

यावेळी, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले. तसेच, पडळकरांनी अजित पवार यांच्यावर बोचरी टीकाही केली. आपण सिरीयस घेत नसल्याचं म्हटलं. त्यावरुन, राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही थेट भाजपला लक्ष्य केलंय.

पडळकरांनी अजित पवारांचं नाव घेत, हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याची घणाघाती टीका केली होती. त्यावरुन, हा वाद रंगला असता राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

यासंदर्भात माध्यमांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारणा केली. त्यावेळी, फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले. आता, सुप्रिया सुळे यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना, यासाठीच भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं का, असा सवाल केलाय. तसेच, हा अजित पवारांचा मोठा अपमान असल्याचंही त्यांनी म्हटलं.

दुर्दैव एका गोष्टीचं मला वाटतं, अजित दादा हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत, विशेष म्हणजे ते आज भाजपासोबत सत्तेत आहेत. तरीही त्यांचा मित्र पक्ष त्यांच्याबद्दल असं बोलतो. भाजपाने याचं उत्तर द्यायला हवं, तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने अजित पवारांना सत्तेत सोबत घेतलं.

मग, ते अजित पवारांचा अपमान करण्यासाठी घेतलं का? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपला विचारला आहे. ही कुठली पद्धत आहे, स्वत:च्या सहकारी पक्षनेतृत्त्वाबद्दल बोलायची, हे दुर्दैवी असून अजित पवारांचा अपमान आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली.

फडणवीसांनी कान टोचले

मला असं वाटतं की, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे, तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे.

अशाप्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले आहेत.

पडळकरांचे विधान काय

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले.

याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? त्यावर पडळकर म्हणाले की, ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे’, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पडळकरांनी सुप्रिया सुळे यांनाही लबाड लांडग्याची लेक, म्हटले. पडळकरांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांवर त्याच भाषेत टीका केली.

गोप्या म्हणत पडळकरांना डुकराची उपमा मिटकरी यांनी दिली. दरम्यान, आज सकाळी पुन्हा एकदा पडळकरांनी अजित पवारांना आपण सिरीयस घेत नसल्याचं म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here