कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : बोंद्रेनगरजवळील जांभळे कॉलनीत शुक्रवारी रात्री झालेल्या तलवार हल्ल्यात एक तरुणासह दोन महिला जखमी झाल्या. या हल्ल्यात तिघेही किरकोळ जखमी झाले असले तरी अंगावरील दागिने हिसकावून नेल्याचे जखमींनी सांगितले.
याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद झालेला नव्हता.
जांभळे कॉलनी येथे पिवळा रक्षक तरुण मंडळ असून या मंडळाच्या आरतीसाठी आनंदा मधुकर बोडेकर (वय २३) हा तेथे गेला होता. आरती सुरू होत असतानाच जांभळे कॉलनीतीलच पंधरा ते वीस तरुणांनी अचानक बोडेकर याच्यावर हल्ला केला, तर एकाने त्याच्या डोक्यात तलवारीचा वार केला.
त्याचवेळी बोडेकर याची पत्नी दीपाली व आई ताईबाई यांनी पुढे होऊन हल्ला करणाऱ्या तरुणांना अडविले. परंतु दीपाली व ताईबाई यांनाही तरुणांनी काठीने मारहाण केली.
यावेळी झालेल्या झटापटीत दीपाली यांचे गंठण, तर आनंदा याच्या गळ्यातील चेन हिसकावून नेल्याची तक्रार जखमींच्या वतीने मधुकर बोडेकर यांनी केली आहे.
तरुणांच्या जमावाने बोडेकर यांच्या घरात घुसून टीव्ही फोडला असून, घरातील साहित्याचीही नासधूस केली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा अंदाज आहे. हल्लेखोर तरुणांची नावे पोलिसांना सांगण्यात आली आहेत. या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.