मुसळधार पावसाने सांगली तुंबली; मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी, अनेक घरांत पाणी शिरले

0
78

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

सांगली : मुसळधार पावसाने शुक्रवारी सांगली जलयम झाली. शहरातील मुख्य रस्त्यासह चौकाचौकांत पाणी साचले होते. उपनगरातील अनेक घरांत पाणी शिरले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.

पावसामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली होती.

शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तास ते दीड तास पावसाने झोपडून काढले. या पावसामुळे स्टेशन चौक, काँग्रेस कमिटी, शिवाजी मंडई, झुलेलाल चौकासह विविध ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते.

स्टेशन चौकातील दोन्ही रस्त्यांवर पाणी आल्याने वाहनांची गती मंदावली होती. काँग्रेस कमिटीसमोरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शिवाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांची पावसामुळे दाणादाण उडाली. मंडईतही दोन ते तीन फूट पाणी होते.

शहरातील गटारी, नाले ओव्हरफ्लो झाले. उपनगरातील नागरी वस्तीत नाल्याचे व पावसाचे पाणी शिरले. मोकळ्या जागी तळी साचली. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. घरात, अंगणात पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपार्टमेंटमधील तळघरातही पाणी साचले होते.

किरकोळ विक्रेत्यांची तारांबळ

पावसाने अचानक हजेरी लावल्याने किरकोळ विक्रेते, हातगाडीचालकांची तारांबळ उडाली. येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडईमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले.

मारुती चौक, दत्त-मारुती रस्त्यांवर किरकोळ विक्रेते मोठ्या संख्येने बसतात. गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर स्टाॅल लावले आहेत. आरास साहित्य विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. पावसामुळे त्यांची धावाधाव झाली.

गणेश मंडळ कार्यकर्त्यांची धावाधाव

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच कोलमडल्याने गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अजूनही काही मंडळांकडून देखाव्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची त्रेधातिरपीट उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here