कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील
मुंबई – आरक्षण संपवण्याचा घाट सरकार करतंय. ओबीसी तरूणांना आवाहन आहे या जीआरची होळी करा. हा जीआर ओबीसी, एससी, एसटी तरुणांवर अन्याय करणारा आहे.
काही ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. जीआर रद्द होत नाही तोपर्यंत कुठल्याही सत्ताधाऱ्यांना गावात फिरकू देऊ नका असंही आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तरुणांना केले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने सुरू केला आहे. आरक्षण संपवण्याची पहिली पायरी सरकार यशस्वीपणे पार पाडत आहे. सरकारी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचे काम सरकार करतेय.
विशिष्ट विचारधारेची व्यक्ती कंत्राटी पद्धतीने सरकारच्या इशाऱ्यावर काम करतील. संपूर्ण मेरिट डावलून मर्जीतील माणसांना भरले जाईल आणि आरक्षण संपवले जाईल. हा संपूर्ण खेळ आमच्या ओबीसी नेत्यांना कळत का नाही? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच ओबीसी आरक्षणावर केवळ सरकारने फार्स केला. तोंडी आश्वासन द्यायचे होते तर बैठक कशासाठी बोलावली? मी बैठकीला गेलो नाही, अनेक ओबीसी आमदार जे आंदोलनात सक्रीय होते ते गेले नाहीत.
तोंडी आश्वासनावर तोंडाला पाने पुसण्याचे काम कालच्या बैठकीत झाले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असं म्हणणारे संघटनेचे नेते कालच्या बैठकीत तोंडी आश्वासनावर कसे समाधानी झाले हा खरा प्रश्न आहे असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
इतकेच नाही तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठा आहेत. त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटीही घेतली. आतापर्यंत मराठवाड्यात २८ लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र दिले आहेत.
हे काम झपाट्याने सुरू आहे. त्यात दुसरीकडे सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे कामही सुरू आहे. मग या बैठकीचा खटाटोप सरकार का करतंय याचे उत्तर ओबीसी समाजाने विचारले पाहिजे असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.
निवडणूक आयोग भाजपाच्या खिशात
खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? हा वाद सध्या निवडणूक आयोगात सुरू आहे. अजित पवार-शरद पवार यांच्या याचिकांवर ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
मात्र तत्पूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपासोबत सत्तेत असणारे पक्ष निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतात अशी टीका करत अजित पवार, एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणूक आयोग खिशात घेऊन भाजपा फिरते. त्यामुळे भाजपासोबत जो पक्ष जाईल, मग २५ गेले, ३० गेले उद्या २ लोकंही गेले तरी पक्ष आणि चिन्हावर दावा करतील.
देश हुकुमशाही आणि मनमानी पद्धतीने चालला आहे. त्यामुळे इथं काहीही होऊ शकतो. काहीही करू शकतो. जो कोणी पक्ष भाजपासोबत जाईल. उद्या २ लोकंही गेले तरी त्यांना निवडणूक आयोग पक्ष, चिन्ह दिल्यास नवल वाटू नये असं त्यांनी म्हटलं.