त्या’ युवकाचा खून आर्थिक देवाणघेवाणीतून!, पेट्रोलची पावती सापडली अन् आरोपी अडकले

0
69

कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील

कऱ्हाड : वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथे महामार्गालगतच्या बंदिस्त गटरमध्ये युवकाचा अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला होता.

या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे तर आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

मंजूनाथ सी. (वय ३३, रा. चेडाप्पा, अरेहाली मायशाद्रा, बंगळूर, कर्नाटक), प्रशांत भिमसे बटवला (३०, रा. बमनेळी, ता. सिंधगी, जि. विजापूर), शिवानंद भीमरायगोंड बिरादार (२६ रा. तोरवी, ता. तिकोटा, जि विजापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर केशवमूर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (३७, रा. थर्ड क्रॉस, इंदिरानगर तारीकेर, जि. चिकमंगलूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे वनवासमाची येथे महामार्गाच्या गटारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची स्थिती पाहता त्याचा खून करून त्याला वनवासमाची येथे आणून पेटवल्याचे पोलिस तपासातून उघड झाले होते.

पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांची आणि पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांची अशी दोन पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली. टोलनाके तपासल्यावर पोलिसांना एका कारची माहिती मिळाली. त्यातूनच तपासाची दिशा निश्चित झाली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक वरोटे यांच्यासह आप्पा ओंबासे, योगेश भोसले, काकासाहेब पाटील, नीलेश विभूते यांचे पथक तातडीने तपासासाठी बंगळूरला रवाना झाले. तेथून या खुनातील मुख्य सूत्रधार मंजूनाथ सी. याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे तपास केला असता या खुनाचे कारण स्पष्ट झाले.

खून झालेल्या केशवमूर्ती व मंजूनाथ सी. हे दोघेही नातेवाईक आहेत. मंजूनाथ याने केशवमूर्तीला नोकरी लावतो, असे सांगून त्याच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. मात्र, नोकरी लावण्यास टाळाटाळ होत असल्याने केशवमूर्तीने मंजूनाथकडे पैसे परत मागायला सुरुवात केली.

तो पैसे देत नसल्याने केशवमूर्ती पोलिसात तक्रार देण्यासाठी जाण्याच्या तयारीत होता. त्यामुळे केशवमूर्तीला कायमचे संपवण्याचा कट रचला.

मंजुनाथने साथीदार शिवानंद बिरादार आणि प्रशांत बडवाल यांच्या मदतीने केशवमूर्तीला नोकरी लावण्यासाठी जायचे आहे, असे सांगून कारमध्ये घेतले आणि गळा दाबून त्याचा खून केला तसेच वनवासमाचीत गटरमध्ये मृतदेह टाकून त्यांनी पेटविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

पेट्रोलची पावती सापडली अन् आरोपी अडकले

मृतदेहाच्या परिसरात पाहणी करत असताना पोलिसांना वाहनात पेट्रोल भरल्याची एक पावती आढळून आली होती. पोलिसांनी त्या पावतीनुसार पंपावर तपास केला असता एक निळ्या रंगाची कार आढळून आली. त्यानंतर टोलनाक्यावरील सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी त्या कारचा माग काढल्यानंतर संशय बळावला आणि पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here