प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढून आगामी सनसमारंभापूर्वी नवीन उद्योजकांना प्रोत्साहन द्या

0
65

कोल्हापूर : आगामी दसरा व दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर बँकांनी उद्योगधंद्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करावा जेणेकरून त्यांना नवीन व्यवसायासाठी किंवा इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होईल याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व बँकांना दिल्या. सर्व महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र यांनी परिपूर्ण प्रस्ताव बँकांकडे सादर करावे.

असंघटित क्षेत्रामधील लोहार, कुंभार, सुतार, शिल्पकार, सुवर्णकार इ.सारख्या व्यवसायासाठी भारत सरकार द्वारा “पीएम विश्वकर्मा” योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा सर्व बँकांनी लाभार्थींना लाभ द्यावा.

कर्ज प्रकरणे येत्या काळात तातडीने निकाली काढून गरजूंना कर्ज पुरवठा करून प्रोत्साहन द्या अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक झाली.


जिल्हाधिकारी श्री रेखावर पुढे म्हणाले की, ज्या प्रौढ व्यक्तींचे बँक खाते नसतील अशांचे बँक खाती उघडून घेण्याच्या सूचना सर्व बँकांना द्या व समाजातील गरीब वर्गाला पुरेसा कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा.

भारत सरकार द्वारा एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान जनसुरक्षा मोहीम राबविण्यात आली होती. या योजनेमध्ये जिल्यातील 82,855 ग्राहकांनी सहभाग नोंदवला. सदर मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल सर्व बँकांचे, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे श्री. रेखावर यांनी अभिनंदन केले.


सदर बैठकीदरम्यान पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना कर्ज वाटपाचे काम प्रगती पथावर असून सप्टेंबर 2023 अखेर 22256 अर्ज मंजूर करून 80% उद्धिष्ट पूर्ण झालेले आहे.

अद्याप लाभ न घेतलेले फेरीवाले ओळखून त्यांना विशेष मोहीम राबवून स्वानिधी योजनेचा लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील अण्णासाहेब पाटील महामंडळ या आर्थिक वर्षांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

या पुढेही कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमांतर्गत जून अखेर निराशाजनक कामगिरी केल्या बद्दल श्री रेखावर यांनी बँका आणि जिल्हा उद्योजक केंद्राला एकत्र येऊन काम करण्याची व डिसेंबर पूर्वी ठरवलेले उद्धिष्ट साध्य करण्याच्या सूचना केल्या.

PMEGP अंतर्गत DIC व KVIB यांचे वार्षिक उद्धिष्ट सप्टेंबरमध्ये पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकेचे व जिल्हा उद्योग केंद्राचे अभिनंदन केले.


या वर्षी पतपुरवठा आराखडा सन 2023-24 अंतर्गत जून 2023 अखेर रु 11465 कोटींचा कर्जपुरवठा झाला असून वार्षिक उदिष्टाच्या 53% उद्धिष्टपूर्तता झाल्याचे सांगितले.

अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. गोडसे यांनी सांगितले. या मध्ये कृषी क्षेत्रामध्ये रु 2054 कोटी चे कर्ज वाटप केले असून MSME क्षेत्रामध्ये मध्ये रु 4194 कोटी कर्ज वाटप झाले.

यावेळी त्यांनी विविध क्षेत्राकरिता वाटप झालेल्या बँक निहाय कर्जाचा आढावा दिला. तसेच पीक कर्ज वितरण वार्षिक उद्दिष्टाच्या मानाने फक्त 40 टक्के झाले आहे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सध्या हर घर किसान क्रेडिट कार्ड अभियान सुरू असून सर्व बँका, कृषी विभाग व नाबार्ड यांनी एकत्रित रित्या काम करून पीक कर्जाची टक्केवारी वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. सर्व बँकांचा आढावा घेऊन सर्व योजनांचे उद्धिष्ट साध्य व प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान MSRLM अंतर्गत 2023-24 मध्ये कोल्हापूर येथील जिल्ह्याला 3280 बचत गटांमध्ये रु. 143 कोटींचे कर्ज वाटप झालेले असून MAVIM योजनेमध्ये 657 बचत गटांमध्ये रु 32 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.


बँक ऑफ इंडिया उप-विभागीय व्यवस्थापक किरण पाठक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक सुषमा देसाई, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक विशाल गोंदके, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे श्री सामंत, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री साखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी केडीसीसी बँकेचे जी एम शिंदे, जिल्हा कृषी विभागाचे श्री श्रीधर काळे ,जिल्हा उपनिबंदक सहकारी संस्था नीलकंठ करे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाचे कुलभूषण उपाध्ये, महामंडळे व इतर विभागाचे चे पदाधिकारी तसेच सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here