अखेर हसन मुश्रीफांची स्वप्नपूर्ती, मिळाले कोल्हापूरचे पालकमंत्रीपद

0
172

कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर: अपवादात्मक काळ वगळता गेली २५ वर्षे मंत्रीपदावर असतानाही जे शक्य झाले नाही ते भाजप आणि शिंदे गटासोबत गेल्यानंतर हसन मुश्रीफ यांना शक्य झाले असून कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे.

मात्र चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री न झाल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले.

मंत्री मुश्रीफ यांनी याआधी कामगार, पाटबंधारे विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले होते. २०१९ ला राज्यात सत्तांतर झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद आले.

त्याचवेळी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे अशी मुश्रीफ यांची इच्छा होती. ती त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती.

परंतू जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याला पालकमंत्रीपद या न्यायाने सतेज पाटील हे पालकमंत्री झाले. त्यानंतर पुन्हा २०२२ मध्ये सत्तांतर झाले. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि मुश्रीफ यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या.

अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद हवे असेल तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर द्यावे लागेल हा हिशोब चुकवत भाजपने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी टाकली आणि मुश्रीफ यांचे स्वप्न सत्त्यात उतरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here