कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळाने मला जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. गेल्या ३५ -४० वर्षांच्या राजकीय व सामाजिक जीवनात ज्या -ज्या संधी मला जनतेने दिल्या, त्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
पालकमंत्री पदाच्या माध्यमातूनही जनसेवेच्या रूपाने जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. कोणताही राजकीय अभिनिवेश न आणता जिल्ह्याच्या आणि पर्यायाने सर्वच घटकांच्या विकासासाठी काम करीन अशी ग्वाही कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कार्यकाळ फार कमी आहे. लोकांच्या माझ्याकडून अपेक्षाही जास्त आहेत, या सगळ्याची मला जाणीव आहे. त्यासाठी मी कठोर कष्ट घेईन. कोणावरही अन्याय होणार नाही, याची मी काळजी घेईन. या नव्या जबाबदारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने मला सहकार्य करावे आणि आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती देखील केली.
नकोत हारतुरे की मिरवणूक
नांदेड येथील सरकारी रुग्णालयातील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जल्लोष करू नये. कोल्हापुरात आल्यानंतर मिरवणूकसुद्धा काढू नये. नांदेडमधील त्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे हारतुरेसुद्धा स्वीकारणार नाही असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केले.