कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोडोली/कोल्हापूर: डोंगरवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे मुलगी आणि नातवंडांना भेटून परत कोडोली (ता. पन्हाळा) येथे जाताना बाळासो महादेव केकरे (वय ६२, रा.
कोडोली, ता. पन्हाळा) यांची दुचाकी आणि समोरून आलेल्या कारची धडक झाली. रविवारी (दि. ८) दुपारी पावणेचारच्या सुमारास डोंगरवाडी फाटा येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले केकरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी भारती (वय ५५) गंभीर जखमी झाल्या.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोकरे दाम्पत्य रविवारी सकाळी डोंगरवाडी येथील त्यांच्या मुलीला आणि नातवंडांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. दुपारी गावाकडे परत येताना डोंगरवाडी फाट्यावर त्यांच्या दुचाकीची आणि कारची समोरासमोर धडक झाली.
खाली पडल्यानंतर केकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली. कारचालकाने तातडीने दोन्ही जखमींना खासगी वाहनातून कोडोली येथील खासगी रुग्णलायात दाखल केले.
त्यानंतर बेशुद्धावस्थेतील बाळासो केकरे यांना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते खासगी कंपनीत काम करीत होते.
त्यांच्या पत्नीवर कोडोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळासो केकरे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.