समन्वय समितीच्या फॉर्म्युल्यानुसार निधी; कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय

0
76

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : महायुतीच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने निश्चित केलेल्या फाॅर्म्युल्यानुसार निधीचे वाटप केले जाईल. मित्र पक्ष ज्यांचे आहेत, त्यांनी त्यांच्या वाट्यातून निधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा नियोजनच्या ४८० कोटी निधी पैकी ७४ कोटीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, उर्वरित निधी व समाजकल्याण विभागाचा निधी लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २०२४ अखेर खर्च करण्याचे नियोजनही बैठकीत करण्यात आले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शासकीय विश्रामगृहात महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राजेखान जमादार, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, आदिल फरास, आदी उपस्थित होते.

यामध्ये, जिल्हा नियोजन समितीकडील शिल्लक निधी, समाजकल्याणकडील ११७ कोटींचा निधी यासह शासकीय कमिट्यांवर चर्चा झाली. राज्यस्तरीय समन्वय समितीकडून ‘३०:३०:३०:१०’ असा निधी वाटपासह सर्वच नियुक्त्यांबाबत फाॅर्म्युला ठरला आहे.

त्यानुसारच जिल्हास्तरावर वाटप करण्यात येईल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. महिने कमी आहेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे आहे. यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

साधारणत: मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकेल, तत्पूर्वी म्हणजेच फेब्रु्वारीअखेर सर्व निधी खर्च करण्याचे नियोजन करावे लागेल. विशेष कार्यकारी अधिकारी, संजय गांधी पेन्शन योजनासह तालुका व जिल्हास्तरीय समित्या तातडीने केल्या जाणार, प्रत्येकांनी आपले नावे देण्याची सूचनाही त्यांनी केली.

नुसते ‘सदस्य’ नको निधी द्या

जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते; मात्र त्यांना निधी दिला जात नाही. नुसते सदस्य नको त्यांना काहीतरी निधी द्या, अशी सूचना खासदारांनी केली.

इचलकरंजीला स्वच्छ पाणी देऊ

इचलकरंजी पाणी योजनेचा विषय खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी काढला. यावर सुळकूड योजनेशिवाय इचलकरंजीला स्वच्छ व मुबलक पाणी देऊ, अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

विनय कोरेंना हवा पदांचा ६० टक्के हिस्सा?

पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांत शासकीय कमिट्यांसह इतर बाबींमध्ये जनसुराज्य पक्षाला ६० टक्के हिस्सा हवा, असा आग्रह आमदार विनय कोरे यांनी केल्याचे समजते.

संजय गांधी पेन्शन दोन दिवसांत

संजय गांधी यासह इतर पेन्शन योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. येत्या दोन दिवसांत संबंधितांच्या खात्यावर जमा होतील, असे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तालुकास्तरीय समित्यांची पुनर्रचना होणार

भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही तालुक्यांत तालुकास्तरीय समित्या झाल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने तेथील समित्यांची पुनर्रचना होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here